पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निमित्ताने वसंत बापट, सुधाताई वर्दे, शाहीर लीलाधर हेगडे, निळू फुले, राम नगरकर, इंदू लेले यांचे खानदेशातले दौरे होत, तेव्हा ॲड. परांजप्यांचे घर हे त्यांच्या अतिथ्यात कसलीही कसर राहू देत नसे. साने गुरुजी नाथ पै, एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, आचार्य केळकर, मधु दंडवते, भाऊसाहेब रानडे, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते, मधु लिमये, राष्ट्र सेवादलाचे डॉ. अंबिके, श्याम पटवर्धन यांचा खानदेशातला दौरा ॲड. परांजपे यांच्या घरापासूनच सुरू होई. परांजपे वकील होते. वकिली करीत, परंतु वकिली हा फावल्या वेळातला उद्योग असा त्यांचा जणू खाक्या होता. समाजवादी पक्ष, राष्ट्र सेवादल, कलापथक, विविध चळवळी, स्थानिक प्रश्नांवरची आंदोलने, महिला सदन, अडल्या-नडल्यांना सर्व प्रकारचे सहाय्य यातच परांजपे दांपत्य दंग असे. त्यामुळे त्यांचे घर हे सामाजिक पाहुण्यांनी बहरलेले असे आणि कार्यकर्त्यांच्या अनौपचारिक गाठीभेटींची तेथे वर्दळ असे. नवनव्या आंदोलनउपक्रमांच्या तपशीलवार योजनांवर येथेच अंतिम हात फिरे.
 या वातावरणात वाढलेल्या प्रकाश व शैला या भावंडांवर सामाजिक आणि कलात्मक जाणीवांचे संस्कार लहानपणापासूनच होणे स्वाभाविक होते.
 'शकुंतलाबाईना त्रास देणारा एकुलता एक डिंकाचा लाडू,' अशा छोट्या शैलाला कलापथकाच्या तालमीतले मुलींचे दमदार पदन्यास, तालाचा धुंद ठेका, लीलाधरचा खडा शाहिरी आवाज ऐकून आपणही गावे, नाचावे असे वाटावे यात नवल कसले ? आईनेही दहा वर्षाच्या शैलाला श्रीपादशास्त्रींकडे गाणे शिकायला पाठवले. आवाज चांगला होता. संगीत विशारदपर्यंत मजल गाठली. पण गायक म्हणून गाणे आत्मसात करण्याबाबत मात्र उत्साह दाखवला नाही, असे त्या स्वत:च म्हणतात. पुढे राष्ट्रसेवादल कलापथकात मात्र त्यांनी भाग घेतला.
 महाविद्यालयात असतानाच त्यांनी लेखन सुरू केले. आपल्या मनातले भाव प्रकट करण्यासाठी कविता आणि ललित लेख यांचा आश्रय घेतला. १९६०-६१ मध्ये मी एस.एम. जोशी यांच्या संपादनाखाली निघणाऱ्या दैनिक लोकमित्रच्या रविवार पुरवणीचे काम पाहत होतो. शैला परांजपे यांनी कवितांबरोबर पाठवलेल्या पत्रात 'कॉलेजात शिकणाऱ्या मुलीच्या या कवितांना न वाचताच केराची टोपली दाखवू नका.' अशा आशयाचा काही मजकूर होता. त्याचे उत्तर पाठवताना मी म्हटले : चांगल्या साहित्याच्या शोधात संपादक असतात. तेव्हा संपादक न वाचताच नव्या लेखकांच्या लिखाणाला केराची टोपली दाखवतात असा चुकीचा समज बाळगण्यचे कारण नाही. त्या पत्राचे उत्तर आले. नव्या कविताही आल्या. लोकमित्रमध्ये त्यातील काही कविता प्रसिद्ध झाल्या. पुढे महाराष्ट्र टाइम्समध्येही मी रविवार पुरवणीचे