पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आंब्याच्या कोयीवरून घसरताना



 उन्हाचे वाभूळवन आता चांगलेच फोफावलेय. अशी लखलखीत उन्हे की, पहाता क्षणी नजर भाजून निघावी. अशा या उन्हात दारासमोरच्या गुलमोहराचे लालचुटुक छप्पर नजरेला थोडा थंडावा देते. छतावरचे पंखे पांचावर ठेवले नि कलरच्या जाळीतून वाळ्याचे गंधगार वारे खोलीत खेळवले तरी अंगाची काहिली होतंच रहावी, असा सरता मे महिना. माथ्यावरचे छप्पर नि खिडक्यांची दारे वितळवून टाकणारा अंगार शिगेला पोचला असतानाच , एक दिवस वर्तमान पत्रातून बातमी येते. मान्सून केरळात लवकरच दाखल होणार . त्या कल्पनेनेही मनाला गारवा येतो आणि काय? एक दिवस चक्क एक थंडगार , गंधदार झुळूक घामेजल्या अंगावर कुंकर घालून गेली. दुसऱ्या दिवशी मी मान्सूनची बातमी शोधू लागले . तर मान्सून ढगाचे गडद सावळे छायाचित्रच समोर दिसले . आणि माझ्या नाकाला मातीचा खमंगगंध ...,आकाश आणि मातीचा पहिल्या भेटीचा मादक गंध हुळहुळून गेला . आता जून नक्कीच जवळ आलाय. एकतर रोज न रोज कोणत्या ना कोणत्या परीक्षांचे निकाल लागत आहेत . आणि या मान्सून स्वागताच्या बातम्या. म्हणजे उन्हाळा नक्कीच संपत आला तर!
 गेल्या वर्षी केवढी वाट पहिली या जूनची! घरात एक परदेशी पाहुणी उतरलेली . ती स्कॉटलंडची . भर बर्फाच्या प्रदेशातून २५ मे रोजी निघालेली ती २७ मे रोजी थेट अंबाजोगाईला येऊन थडकली . अगदी मराठवाड्याच्या फुफाट्यात , खिडकीतून येणाऱ्या गरम वाऱ्याच्या स्पर्शाने ही गोरी पोर पार लालेलाल होऊन जाई! आणि तरीही तिचा हट्ट दुपारी खेड्यात जाण्याचा. शेवटी मी तिला विनवले, बाई ग ऽऽ मृगाची बरसात होऊ दे. मग खुशाल खेड्यापाड्यातून भटकंती कर.
 जून उजाडला की मनावरची मरगळ झडून जाते. पोरांना वेध लागतात शाळेच्या पहिल्या दिवसाचे. वह्या पुस्तके , त्यावरची खाकी कव्हर्स , गणवेशाची खरेदी यांची धांदल . खरे तर या वेळेपर्यंत सुट्टीसुद्धा अजीर्ण व्हायला लागलेली असते. घरादारातून लोणच्याचा पसारा पडलेला असतो. हळद , मीठ, तिखट, फोडी यांच्या पसाऱ्यात अडकलेली आई . हिंगमेथीची खमंग फोडणी , मसाल्यात घोळलेल्या फोडी. या फोडी आजी नि आईची नजर चुकवून , बचक भरून, लपवून आणण्याने त्याची चव



आंब्याच्या कोयीवरून घसरताना ॥७३॥