पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आकाश वाई आकाश
अस्सं कस्सं आकाश
भुलोजीला लेक झाला
नाव ठेवा प्रकाश ... .

 शेवटी बाळाचे नाव गणपती वा गजाननच ठेवतात . भाद्रपद महिना वर्षाऋतूतल्या अखेरच्या चरणातला . पिके पोटऱ्यात आलेली असतात .अश्विनथंडी बरोवर रानातल्या तुरीवर पिवळा फुलोरा फुलायला लागतो. नवी साळ तयार होत आलेली असते. अशावेळी येणारा हा उत्सव जणू भूमीच्या उर्वराशक्तीच्या , तिच्यातील सर्जनशक्तीच्या सत्काराचे प्रतीकच ! कदाचित काळाच्या प्रवाहात मूळ उत्सवाचे स्वरूप बदलले असेल . कुमारिकांच्यात असुशक्ती ... म्हणजे एकप्रकारची जादुईशक्ती असते असा समज होता. वयात येणाऱ्या, ज्यांच्यातील उर्वराशक्ती, जननशक्ती जागृत होण्याच्या मार्गावर आहे, अशा कुमारिकांकडून शेताभाताची पूजा करण्याचा आणि त्याद्वारे धनधान्य समृद्धीची कामना करण्याचा संकेत तर या उत्सवामागे नसावा?
 भाद्रपद आश्विनात सायंकाळी उत्साहाने बहरलेल्या पोरीसोरींचा घोळका या घरातून त्या घरात जाताना दिसे . आज मात्र असे घोळके फारसे आढळत नाहीत. भुलाबाई मांडणाऱ्या मुलींच्या गटात जातीभेदाला मुळीच थारा नसे , ब्राह्मण , मराठा, सोनार , साळी, माळी सर्व जातींच्या पोरी एकत्र असत , माझी एक दलित मैत्रीण भुलाबाई मांडल्याचे सांगते . भुलाबाईची जागा बहुदा देवघरात नसे . आश्विन पौर्णिमेला एकत्र जमून जाग्रण करायचे. त्यादिवशी सर्व पारंपरिक गाणी म्हणायची. प्रत्येकीने मोठा डबा भरून घसघशीत खाऊ आणायचा . आणि जाग्रणाच्या निमित्ताने नाच, गाणी , नाट्यछटा , नाटके असा भरगच्च कार्यक्रम . रात्रभर धिंगाणा असे . सकाळी घरोघर परतायचे ते पुढच्या वर्षीच्या आश्विनभादव्याची स्वप्ने मनात गोंदवून .
 आता ते रुणझुणते भादवे हरवले आहेत. आता दरवर्षी श्रावण बरसतो आणि हरवलेल्या भादव्यांची स्वप्ने आठवीत कधी भाद्रपद उलटून जातो तो कळत नाही .

܀܀܀

॥ ७२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....