पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणायचीच.
 ' यादव राया राणी रुसून बैसली कैशी?' या गाण्यातली रुसलेली सून मला खूप आवडायची. तिला समजावायला मामंजी , सासूबाई , दीर सगळे जायचे. पण ही महा खट. तिला दागिने नको असायचे. आमच्या वर्गात उषी होती. तिचं डोकं नेहमी वेगळ्या दिशेने धावायचे. मंगळसूत्र किंवा लाल चाबूक घेऊन जाणाऱ्या आणि राणीला लाच देऊन किंवा धाक दाखवून आणणाऱ्या पतिराजांपेक्षा हिच्या गाण्यातला पती वेगळाच असे . ती म्हणे ." ... पती गेले समजावायला , चला चला राणीसरकार आपुल्या घराला , दौत नि लेखणी आणली तुम्हांला..."
 दौत आणि लेखणीच्या आहेरावर खूश होऊन आमची आधुनिक राणी तिच्या घरी परतत असे . खरं तर अधमुऱ्या गोड दह्यासारखं आमचं वय होतं. जाळीदार पडद्याआडून पल्याडचे भास जाणवावेत तसे सासरमाहेरचे वेगळेपण आम्हाला जाणवे. आणि म्हणूनच निगूतीने , खपून केलेल्या करंज्या, तवकात भरून पालखीतून माहेरी पाठवताना होणान्या आनंदापेक्षा ,

... माहेरीच्या वाटे , गुलालबुक्का दाटे
सासरीच्या वाटे, कुचूकुचू काटे ...

या ओळी दणक्यात गाण्याचा आनंद अधिक असे.
 टिपऱ्या, खिरापती , कोजागिरीची जाग्रणं, खेळ , नाटकं , नाच अशा शेकडो आठवणींचे जिवंत मोहोळ या व्रताभोवती गुंफलेले आहे . आज पस्तीस वर्षांनंतरही ते जागले की मन मोहरून येते.
 खानदेश, विदर्भ , बागलाण या परिसरात भाद्रपदपौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत ८ ते १५ वयाच्या मुली भुलाबाई मांडतात. भुलाबाईला व्रत म्हणण्याऐवजी लोकोत्सव असे म्हणणे अधिक योग्य होईल. कारण या उत्सवात- या व्रतात कोणतेही कठोर कर्मकांड नसते . जणू तो एक खेळाचाच प्रकार. आठ ते चौदा वयोगटातील कुमारिका, सर्व जातीतील मुली हा उत्सव साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्रात सांगली , कोल्हापूर, पुणे, नगर भागात या लोकोत्सवाशी अगदी मिळताजुळता असा भोंडला मुली मांडतात . दोनही उत्सवातील नमनगीत आणि इतर एकदोन गाणी वगळल्यास बहुतेक गाणी सारखीच आहेत .
 वऱ्हाड, खानदेश , मालेगाव, बागलाण भागात भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेला माहेरपणाला येते . रोज सायंकाळी आळीतल्या मुली एकत्र येऊन , प्रत्येकीच्या घरी, भुलाबाईसमोर टिपऱ्यांवर गाणी म्हणतात. भुलाबाई आणि भुलोजीची जोडमूर्ती असते . भुलाबाईच्या मांडीवर बाळ असते. भुलाबाई बाळंतपणासाठी माहेरी आलेली असते. पहिले अकरा दिवस बाळाची बाज असते . बाराव्या दिवशी बार बालोदी नाव रोज ठेवले जाते. तेही असे ...



हा भाद्रपदाचा महिना ॥७१॥