पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ऐटदार असे तर शर्टाचा रंग गुळमट विटकरी. एकूण काय , हरेक जोडी विजोडच. तेव्हा खूप राग येई . आता मात्र कळतं की मालणबाईच खरी शहाणी. मेड फॉर ईच अदर वगैरे पडद्यावर , नाहीतर पुस्तकातच!
 मला आवडलेली जोडी अखेर सापडे . उंच उभ्या तुऱ्याचा मुकुट ल्यालेला भुलोजी . त्याचा विटकरी शर्ट बेताचाच असला तरी लक्षात येत नसे . आणि भुलाबाई तर मोठी देखणी . कानात झुबे. माथ्यावर बिंदी बिजवरा . जामूनी रंगाची साडी. जर्द हिरवी चोळी. वर सोनेरी बुट्टे. मांडीवरच्या बाळाला आकाशी कुंची. पण ...
 पण म्हणजे आमचे पप्पा. पप्पांच्या जवळ आत्ताच्या आत्ता हा शब्द चालत नसे.
 "आज भुलाबाई पसंत कर. आणि दोन दिवस त्याबद्दल एक शब्द बोलायचा नाही. हट्ट करायाचा नाही. मग तेरवा भुलाबाई आणू . बघ माझ्याजवळ फद्यादेखील नाही." असे म्हणत सायकलवर टांग मारून ते कोर्टात निघून जात . आईला माहीत असे की भाद्रपदी पौर्णिमआधी चार दिवस भुलाबाई आणली तर दाखवादाखवीत ती नक्कीच फुटणार . कारण माझी भुलाबाई तुझ्यापेक्षा छान - यातच खरा आनंद .
 शेवटी पौर्णिमेच्या आदल्या संध्याकाळी सर्वात सुंदर भुलाबाई , खणखणीत दहा आणे मोजून घेतली जाई. पाटावर बसून वाजतगाजत घरी येई. - आई,कोनाडा आधीच सजवून ठेवी. महिरपदार मखर, त्यावर रंगीत कागदाची फुलं चिटकवलेली. शिवाय झिरमिळ्या. पहिल्या दिवशी कोणती खिरापत करायची, यासाठी मी आईचा जीव खात असे . कुण्णाला ओळखता येणार नाही, असा खास पदार्थ हवा असायचा. तीही माझ्या उत्साहात सामील असायचीच. मग कधी लालभोपळा नि गूळ घालून केलेले घारगे नाहीतर ताज्या कोवळ्या मक्याच्या कणसांचा तिखट कणसारा ती करी.

.., आडावरच्या ताडावर
धोबी धुणं धुतो बाई , धोबी धुणं धुतो
भुलाबाईच्या पातळाला , जामूनी रंग देतो बाई
जामूनी रंग देतो.
भुलाबाईच्या पातळावर , सोनेरी बुट्टे काढतो बाई .
सोनेरी बुट्टे काढतो ...

 मुली फेरात गात . तेव्हा मन कृतकृत्य होऊन जाई . हे भुलाबाईचं वेड वयाच्या सहाव्या वर्षी मनात भरलं ते अगदी सोळा वर्षापर्यंत टिकलं. भाद्रपद पौर्णिमेपासून ते शरदपौर्णिमेपर्यन्तच्या संध्याकाळी मंतरलेल्या असत.
 शाळेतून यायचं, दप्तर दारातून फेकायचं, नि हातपाय धुवून टिपऱ्या हातात घेऊन जो फेरा निघायचा तो थेट रात्रीपर्यंत. प्रत्येकीच्या घरी किमान पाच गाणी

॥ ७० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....