पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शुक्रवारी जिवती पूजत असे. तर या अशा घरात माझी जरा घुसमटच व्हायची. ते वय तसं अधमुरं. असोशी हौशीनं मिरवायचे दिवस. पण घरात ना हळदी कुंकवाचा दणका ना नवरात्रीतले मंत्रजागर. बोडणासाठी नाहीतर नवरात्रात कुमारिका म्हणून मला आमंत्रण आले की माझ मन फुलून यायचं. कर्मकांडातलं वैय्यर्थ, आज-कळत असले तरी ते विधी करताना मनाला आगळा आनंद मिळे. मनगटावर केशरचंदनाच्या रेघा. कपाळावर ओले कुंकू नि वर तांदुळाचे दाणे. भुवयांत रेखलेली हळद. न्हालेल्या केसांवर फुलांचा गजरा. रेशमी परकरपोलका. या थाटामाटात आपण कोणीतरी खास आहोत असे वाटे.
 आमच्या निरामय घरात भुलावाई मात्र थाटामाटात माहेरपणाला येई . आमच्या घरात देव .सोवळेओवळ ,शिवाशिव असल्या भानगडी नसल्याने विविध जातीजमातींच्या मैत्रिणींचा घोळका अखंडपणे भवताली असे. आमच्या उंच चढणाऱ्या आवाजाला आणि धुसमुसळ्या पावलांना थोडाफार धाक असायचा आमच्या घरमालकांचा वाबांचा. पण हा धाक घरमालक म्हणून नसे तर आमच्या कन्याशाळेचे अत्यन्त शिस्तप्रिय मुख्याध्यापक , हेडसर म्हणून असे.
 घरासमोरच्या गजानन कंपनीच्या ओट्यावर श्रावणभर गर्दी असायची. आधी राख्यांचा चमचमाट. पाठोपाठ पोळ्याची धांदल. मोचीवाड्यातली मालणमावशी श्रावण पौर्णिमेनंतर एक दिवस आपला संसार ओट्यावर मांडीत असे. टोपल्या भरभरून रंगीबेरंगी बैलजोड्या येत. काही जोड्या साध्या मातीच्या लाल कावेने रंगवलेल्या . चार आण्याला खिल्लारभर मिळणाऱ्या. पण काही वैलजोड मात्र खूप देखणे आणि सुबक. अंगावर झळझळीत गोंडेदार झूल . कपाळावर विंदीपट्टा. सोनेरी शिंगे.
 पोळ्याची दंगल संपली की गणपतीवाप्पांची चलती सुरू होई. बैलांची जागा तहेतऱ्हेचे गणपती घेत. गणेशचतुर्थीच्या संध्याकाळपर्यंत गणपती ओट्यावर असत. रात्री उरलेसुरले गणपती थकलेल्या हातांनी ती भरून ठेवी .
 आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून खिडकीत येऊन पहावे तर रंगीवेरंगी भुलाबायांची उतरती आरास ओट्यावर दिमाखाने सजलेली असे. दुरूनही डोळे सुखावून जात. आंघोळ न करताच, कुरळ्या झिपऱ्या सावरीत. पेटीकोटवर फ्रॉकची झूल न चढवताच मी रस्ता ओलांडून मालनवाईकडे जात असे . मालनवाई प्रेमाने मला म्हणे , "बईन , तुले कोंची हवी? ही गुलाबी पातळवाली ठीऊ ? जा. तुज्या वापाले धा आने मांगून आन ."
 आता माझे मन सैरभर होई . कोणती निवडावी यातनं? माझा निश्चय होत नसे. एखाद्या जोडीतल्या भुलाबाईच्या पातळावरच्या बुट्या सुंदर असत . पण भुलोजीच्या शर्टाचा रंग पिवळाधोट ! जोडीतल्या भुलोजीचा फेटा जर्द जांभळा नि सोनेरी जरीचा .



हा भाद्रपदाचा महिना ॥६९॥