पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वर्षांचा कालावधी वाहून गेला . पण सामान्यांना धारेवर धरून शिक्षा करणारे इंद्राचे सिंहासन आणि इंद्र आहेच. कधी शिक्षा ठोकणार इंद्र तर कधी सिंहासन-विराजमाना इंद्राणी ! सत्तरी ओलांडलेले माझे आजोबा . ऐन तिशीत विधुर झालेले . आपल्या कच्च्याबच्च्यांसाठी स्वतःच्या भावनांवर पालाण घालून एकाकी आयुष्य जगलेले. आषाढाचा पहिला दिवस आला की मला म्हणत . "शैला बयो, मेघदूत वाचलं आहेस? कोण होता कालिदास?"
 मग माझ्या निमित्ताने कापऱ्या आवाजात गुणगुणत ...
 ... काचित कान्ता विरह करुणा ...
 ... आषाढस्य प्रथम दिवसे ... मेघमाश्लिष्ट सानु .......
 त्या पावसाळी हवेत भिजलेले ते शब्द कळण्याची अक्कल तेव्हा नव्हती. पण आषाढातला पहिला दिवस आला की सारे आठवते . कालिदासाच्या यक्षाने कोसो दूर असलेल्या प्रिय पत्नीला मेघांबरोबर संदेश पाठवला . आज एक यक्षपत्नी-पुन्हा चुकले बघ- मी एकटीच का विरहिणी आहे ? माझ्यासारख्या हजारो विरहिणी हिमालयापासून ते कन्याकुमारीच्या पायथ्यापर्यंत विखुरल्या आहेत. पावसाच्या पहिल्या स्पर्शाने त्यांच्याही अंगातून लक्षतारा रुणझुणल्या असतील आणि विरहाच्या वेदनेचे कितीतरी निःश्वास हवेत मिसळले असतील. दिवाळीतल्या दिव्यांची ज्योत ,उन्मत्त वाऱ्याने जिथल्या तिथे लवलवते, तसे कितीतरी पंख आतल्याआत फडफडले असतील. अशा लक्षावधी यक्षपत्नींचे घायाळ मन घेऊन मी या मोकळ्या आभाळाखाली....उभी आहे. आभाळाचे थवे, हो थवेच ,माझ्या माथ्यावरून भरारा वाहताहेत. त्या सावळ्या थव्यांच्या कानांत मीही तुला निरोप धाडला आहे.

रेशमी पदरात या अग्निफुले मी वेचिली
धुंद होऊन चालताना वेदना ओलांडली
यात्रा तुझी होवो सुखी या इथूनी चिंतिते
स्वप्न गहिरे मिटवुनी अर्ध्यावरती मी थांबते.


܀܀܀



आषाढीतला एक दिवस ॥६७॥