पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लवलवणारी अगदी समोर येऊन, वेडावून लुप्त होणारी वीज . मग प्रचंड गडगडाट. अशा वेळी खांद्यावरच्या हातांची पकड आणखीनच गच्च होई . दरवर्षी आषाढ येत असे . कधी मुकुंदराजाच्या समाधीखालची बुट्टेनाथाची दरी तर कधी तळ्याकाठचा महादेव तर कधी शेतावरची नांदती विहीर. आषाढाचं नवेपण दरवर्षी नव्या तऱ्हेने साजरे होई.
 आणि आज ?
 हा तेरावा आषाढ.
 यक्षपत्नीच्या वेदनांचे मुके वळ , आज माझ्या तनामनावर उमटले आहेत. माझ्या वेडांना पारिजातकाच्या फुलांसारखे अलगद ओंजळीत धरून जोजावलेस . मुक्तीचा नवा प्रत्यय प्रत्येक क्षणी देणारा तू ...आज दूऽर गजाआड बंदिस्त आहेस . हेच ढग तुझ्या दगडी खोलीच्या वीतभर खिडकीतून तुला दिसत असतील . खुणावत असतील. उंच उंच ,चिरेबंदी दगडांनी बांधलेला चौकोनी तुरुंग , भवताली विजेच्या काटेरी तारा. आणि त्या भिंतींच्या वरून , त्यांना न जुमानता धावणारे मुक्त आभाळ . ते भुरुभुरू धावणारे आभाळ पाहून तू नक्कीच खदखदून हसला असशील. हसता हसता तुझ्या डोळ्यात दाटून आल्या असतील. मी लिहून पाठवलेल्या गझलेच्या ओळी .

... गजाआड माती,
परि, मनमयूर मुक्त
दूरातून जडवितो
निखळता स्वरान्त
शब्द शब्द पेंगुळले
विझू विझू वाती
मनातूनी मोहळती
मग्न ... भग्न ... राती ....

 शब्द माझे . पण मनाची उलघाल तुझ्याच. तुझ्या पत्रातल्या ओळी गजाआड असलो तरी मनाने तुमच्यात आहे. सारे सूर संपून गेलेत असं का तुला वाटतं? अगं, आता कुठे सूर लागलाय माझा . माझं मुक्त मन ,सूर जुळवून तब्बेतीनं गातंय हे दिवसही संपणार आहेत. सन्मानाने संपणार आहेत. तोपर्यंत तुझे सूर हरवू नकोस .
 अरे राजा , माझ्या प्राणातला कोमल गंधार तू कोवळ्या शब्दांनी जपला आहेस . तीव्र मध्यमाचे कणखर स्वरही माझेच. प्राणांना शोष पडला तरी विझू देणार नाही मी ते!
 पूजेसाठी आणलेल्या कमलकळीत शृंग निघाला नि इंद्राने यक्षाला शिक्षा ठोठावली. एक वर्षाच्या सक्तीच्या विरहव्यथेची. यक्षाची रवानगी रामगिरी पर्वतावर. तर, बिचारी यक्षपत्नी अलकानरीतल्या घराच्या सौधावर उभी राहून वाट पहातेय ! हजारो

॥ ६६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....