पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आषाढातला एक दिवस



 तिसऱ्या मजल्यावरच्या मोकळ्या गच्चीवर मी एकटीच उभी आहे.
 दक्षिणेकडून ढगांचे बलदंड थवेच्या थवे..हा शब्द चुकला ना? तू जवळ असतास तर ठसक्यात म्हणाला असतास. थवे नाही जथ्थे ! जथ्थे!
 थवे.. कधी पक्ष्यांचे . कधी हळच्या सुरांचे तर कधी तुझ्या हव्याशा शब्दांचे. तुझ्या वास्तवात मात्र नेहमीच जल्लोष असतो जथ्थ्यांचा. दुष्काळी मोर्चा : हजारो स्त्रीपुरुषांचे जथ्थे लाटांसारखे एका पाठोपाठ एक आवेगाने येणारे.
 सेवादल : नव्या जाणिवा घेऊन परिवर्तनाच्या दिशेने झेपावणारा वेडया तरुणांचा जथ्था . आणि तुझा खेड्यातला दवाखाना? तिथेही रोग्यांचा करुण जथ्थाच ना?
 तर, आभाळाच्या बलदंड हत्तींचा जथ्या दक्षिणेकडून वर सरकतोय. हा हा म्हणता दाही दिशा गर्द कोनफळी रंगाच्या सुस्त आभाळाने झाकून गेल्या आहेत . क्षितिजाच्या कडांनी विजा लखलखताहेत . एक टप्पोरा थेंब माझ्या ओठांवर टपटपला बघ ! तू जर इथे असतास तर या गच्चीवर कशाला उभी राहिले असते अशी एकाकी ! आज आकड्यांचे भान आलेय. बारा आषाढ तुझ्या संगतीने साजरे झाले .
 सरता ज्येष्ठ असायचा . अचानक , एके दिवशी दक्षिणेचे दार मोकळे व्हायचे. भन्नाट वाऱ्याचे तुफान भर वेगाने दौडत यायचे. येताना काळाभोर खिल्लार वळवित आणायचे. अशावेळी माझे नकटे नाक खुलून जाई . दूरवर पडणाऱ्या पावसाचा खमंग ओलाकंच वास माझ्या श्वासात भरून जात असे. मग अंगातून एक आगळे उधाण ओसंडून येई . वाटत असे, नुस्ते धावत सुटावे. वारा प्यालेल्या वासरासारखे!
 असे ओले दिवस उगवले की माझ्या हाताने चहात साखर जास्त पडायची किंवा पोहयात मीठ घालायलाच विसरायची. तुला हे सारे कळे .मग तू म्हणायचास . फिरायला जाऊया . तुझी फटफटी मुकुंदराज दरीच्या दिशेने धावू लागायची. पावसाचे झुरुमुरू थेंव. वाऱ्याचा भन्नाट वेग . त्या वेगाला मागे सारीत पुढे धावणारी फटफटी. तुझा खांदा एका हाताने धरीत , दुसऱ्या हाताने भुरभुरत्या बटा सावरणारी मी. समोर उंचउंच जांभळे कडे. पावसाने भिजलेले काळे दगड, आपल्या काटकुळ्या हातांनी पावसाचे नवेपण गच्च धरून ठेवणारी , रस्त्याच्या कडेची झुडपे. मधूनच लखलखत ,



आषाढातला एक दिवस ॥६५॥