पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एक मधुर राजस्थानी गीत आहे. नवीनवेली बिनणी बहू घरात आहे . तीजेच्या आदल्या शिंजाऱ्याच्या म्हणजे शृंगाराच्या रात्री मैत्रिणीने किती सुरेख मेंदी रचली हातांवर. कौतुकाने त्याला, भंवरजीला दाखवायला गेली तर हा रुसून फुगलेला . त्याला होत होती मेंदीचीच अडचण! तो बोलेना की नजर वर करून पाहिना. बिनणी संतापली नि थेट सासूकडे आली. आपल्या अरसिक आणि भांडखोर नवऱ्याची कागाळी करू लागली.

थारा बेटा लडोकडा
कुन निरख्यो म्हारा हाथ?
मेहंदी रासणी?...
... तुझा लाडका लेक
भलताच भांडखोर नि अरसिक.
माझ्या मेंदीभरल्या हाताचं..
कोण कौतुक करणार...?

 पंचमीचे झुले निंबावर , आंब्यावर, चिंचेवर अजूनही हिंदोळताहेत.
 माहेरच्या अंगणातली दहादेशींच्या चिमण्यांची किलबिल अजूनही ताजी आहे. हा सुनहरी श्रावण , ही लालचुटुक मेंदी, धरती आकाशाला कवेत घेणारे उंच उंच हिंदोळे, मोहरलेलं अंगण , सारं उडून जाईल . पण रंगलेली मेंदी आणि तिच्याभोवती दरवळणाऱ्या सायीसारख्या दाट आठवणी उजळत राहतील, सुवासत राहतील, पुढचा श्रावण अंगणात येईपर्यंत ! तळव्यावर पुन्हा एकदा मेंदी रंगेपर्यंत!

܀܀܀

॥ ६४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....