पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वप्नावर मेंदी तगली. आज स्वप्नसजण दारी आला आहे. मेंदीचे रूप. रंग . गंध नव्याने मोहरले आहे .
 खरं तर झाडाचं वैभव फुलांच्या बहरात असतं. पण मेंदीचं सारं लावण्य तिच्या इवल्याशा पानड्यांच्या गहिऱ्या रंगात दिमाखानं लहरणाऱ्या शेलाट्या पानतुऱ्यात साठलंय , मोराची मिजास त्याच्या पाचूच्या पिसाऱ्यात. पायाकडे मात्र नजर सुध्दा टाकायची नाही . मेंदीचंही असंच आहे . शेंड्यावर भरगच्च भरलेले हिरवेकंच पिसारे डोळे भरुन पहायचे. पायथ्याच्या हडकुळ्या खोडाकडे मुळांच नजर टाकायची नाही . पण या वाळक्या खोडाचा . हिरव्या दिमाखाला घट्ट आधार आहे हे मात्र विसरायचं नाही!
 मेंदी ऐनात आली आहे . कुंपणापाशी रोज कितीतरी कोवळी पावले थांबतात . पाचूपानड्यांवरुन इवले इवले हात , तरुण अधीर हात फिरतात . पोरीबाळी परकराचे

ओचे भरभरून ताजी पानं घेऊन जातात . रात्र निघून जाते. पहाटेच्यापारी दवात भिजलेली लाल पऱ्याची जर्द विमाने मेंदीच्या कुंपणावरून निघून जातात. मेंदीच्या डोळ्यासमोर येतात लालचुटुक नक्षीदार तळव्यांची असंख्य मोरपिसे. मेंदी मनोमन तृप्त होऊन जाते.
 मेंदीची कितीतरी रूपं . तळव्याच्या रेशमी पोतावर दिमाखाने मिरवणारी नखरेल लाल नक्षी . हातभरुन रंगलेली लाली. उगतीच्या आभाळासारखी. वाटलेल्या मेंदीचा हिरवाकंच गोळा, नववधूच्या पावलावर मनगटापर्यंतच्या हातावर रेखलेली ओल्या मेंदीची फुलवंती! पंचमीसाठी माहेरी आलेली गौरी मालण अंगणातल्या मेंदीची पानं अधिऱ्या हातांनी खुडते बाऽरीक वाटलेला मेंदीचा गोळा तळव्यावर, नखावर रचतांना स्वप्नांची पाखर भिरभिरतात. उद्या या केवड्यांच्या पिवळ्याधमक पात्यांवर लालचुंदडी रंगेल, पावलांच्या काठांनी गुलमोहरी साज सजेल. अशा वेळी तिच्या मनात येईल, रानपाखरासारखं उडून जावं , चिरेवंदी वाड्याच्या नजरा चुकवून थेट त्याच्यासमोर हे रंगभरे तळवे धरावेत. काय म्हणेल तो? काय वोलेल तो? रात्र अशीच उडून जाते. गोऱ्या मालिनांच्या पावलांना भान येतं , तव्हा हात रंगून लालेलाल झालेलं असतात. मेंदीत काथाच्या जोडीने गहिऱ्या आठवणींचे ओले रंग मनावर चढलेले असतात.
 थेट कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत , नाहीतर द्वारकेपासून जगन्नाथपुरीपर्यंत कुठेही जा. मेंदीनं रंगलेले हात दिसणारच . भारतीय स्त्रीला मेंदीचा भलता सोस . तळव्यावर मेंदी रेखून आणि पायावर नक्षीच्या जयपुरी मुजोड्या मढवून इथेतिथे मिरवण्यात केवढा दिमाख असतो म्हणून सांगू! खेड्यातल्या अडाणी पोरीपासून ते थेट साडीच्या घोळदार निऱ्या सावरीत महाविद्यालयाच्या पायऱ्या चढणाऱ्या कॉलेज कामिनीपर्यंत .
 एकदा मी दिल्लीला गेलेली . कनॉट प्लेसच्या परिसरातील राजस्थानी एम्पोरियममध्ये

॥ ६२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....