पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेंदी



 काळ्याभोर ढगांनी बहरलेला आषाढ आता ओसरू लागला आहे . मेघांच्या घनघोर गर्जना, विजांचा लखलखाट आणि सहस्रधारांनी ओसंडणारा आवेग, हे सारं आता थंडावलंय. श्रावणाची हसरी खुलावट जागोजाग सजली आहे. एखादी सर हळुवारपणे भुरभुरून जाते. काळीचा शेव भिजतो न भिजतो तोच सुनहरी ऊनाची नॉयलानी घडी निसटून अंगभर उलगडते. त्या कोवळ्या सोनसळीच्या स्पर्शाने मेंदी उगाच लाजते. हिरव्या लेण्याने भरलेले पानतुरे अंगोअंगी थरथरतात.
 पाऊसधारात अखंड न्हालेली मेंदी आता ताजीतवानी झाली आहे ..ग्रीष्माच्या तलखीनं पान न पान कोमेजून गेले होते. निर्विकार आभाळाकडे आशेने पहात , उन्हाचे अंगार काटकुळ्या फांद्यांनी रिचवून टाकले . पायतळीची कोरडीठाण माती अन् या वाळक्या काड्या एकमेकींना धीर देत ग्रीष्माचा अंगार मुकाटपणी पिऊन गेल्या. एक दिवस नैर्ऋत्येच्या दारातून हलकीशी झुळूक आली .मेंदीच्या कानाशी लागून गेली, काहीबाही सांगून गेली . मेंदीला खुदकन हसू फुटलं . झुळकीपाठी पाऊस आला . अंगण भिजवून गेला. बावरलेल्या मातीनं मेंदीला घट्ट मिठी घातली. मेंदी काय ते उमजली अन् एक लालजर्द वीज अंगभर लखलखून गेली.
 रोहिण्या बरसू लागल्या. मेंदीच्या कुंपणाशी पाण्याचे लोट वाहू लागले. साठू लागले. आकाश भरून येई. सुसाट्याचा वारा दहादिशातून भणभणत धावू लागे. वाऱ्याच्या सैराट तालावर अंग घुसळून नाचणाऱ्या थेंबधारात मेंदी सचैल भिजून जाई. जीवघेणा पाऊस आणि आषाढवाऱ्याच्या धसमुसळ्या अंगलटीत ओढ होती, ओलावा होता.
 ... आता आषाढाचं पाणी पिऊन तृप्त झालेले पानाचे थवे रात्रंदिवस मनमुक्त झोके घेत बसतात. आषाढ़ मालवतो आहे. श्रावणाची तरळ हवा दिशादिशांत भरून राहिली आहे. श्रावणाचं भान काही न्यारंच! सारं कसं हलकंफूल. दिवस नि दिवस तार लवून कोसळणारी धार नाही की आकाश धरती वेढणारा वाभरा वारा नाही.
 क्षणात फुलणाऱ्या आणि क्षणात मिटणाऱ्या थेंबकळ्या, क्षणात हसणारं आणि क्षणात रुसणारं मलमली ऊन. ग्रीष्माच्या चढत्या उन्हाच्या रखरखाटात श्रावण



मेंदी ॥६१॥