पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जांभळी! त्यांच्या पाठी लागतात काटाळ वाभळी !" तिसरी .
 एवढ्यात जांभळीची मालकीण वच्छा आली. वच्छा माझी खास मैत्रीण. दोघीजणी या गावात सासुरवाशीणी म्हणून एकाच साली आलो. वच्छी होती तेराचौदाची आणि मी विशीतली.
 "या वयनी, खा जांभळं. तुमच्याच शेतातली पन आग्रेव माझा. नाना कुठाईत?" हा म्हणाला. गावची शीव आली की शुद्ध गावरान भाषेत बोलण्याचे ह्याचे खास तंत्र आहे.
 "त्ये कुठं असतात गावात? जवा बघावं तवा आंब्याला न्हाईतर लातूरला पळायचं. घरात बायको हायना भक्कम शेताकडे पाह्यला. बाजारचं नाव करून पुरुष पळतात शहरात. घरातल्या लक्ष्म्या हाईतच मागे, घरात नि रानात राबायला." वच्छा फणकाऱ्याने उत्तरली.
 खरंच ,बायांनी किती म्हणून राबायचे? चूलसारवण , लेकरांचे हगणेमुतणे , सडाअंगण , खाणेपिणे, जनावरांचे शेण काढा , गवऱ्या थापा , शेतातले खुरपणं आहे तर कधी पेरणी तर कधी सुगीची धावाधाव. लाकूडफाटा गोळा करा . तुरांट्या रचून ठेवा. शेतात दारं धरा . बाजारात माळवं विकायला बाईनंच धावायचं. कारण तेच पैसे तिच्या हातखर्चाचे ...मालकीचे! डाळीसाळी करा. बीजभरणासाठी शेंगा फोडा. वैलामागे हुबे रहा. मळणी करा . उफणणी करा . ही सगळी कामं बाईनंच करायची. या अलिखित करारातील कामं दिवसेंदिवस वाढतच चाललीत. पूर्वी दवाखान्यात तरी लेकराला न्यायचा वाप, आताशा हे कामही बायाच करतात . किती आघाड्यांवर लढायचे बाईने? बदलत्या काळासोवत मोकळ्या आभाळाखाली येण्याऐवजी बाई अधिकाधिक गुदमरत चालली आहे का? मला गढवालमधील बंगाली गावच्या म्हाताऱ्याचे उद्गार आठवतात. "रंडवा होना बड़ा दुर्भाग्य है, सबके लिए. हमारा शास्त्र कुछ भी कहे ... विधुर होणे, पुरुषाआधी बाई मरणं फार वाईट. एकटी बाई सगळा संसार सावरते, चालवते. पण पुरुषाला ते जमत नाही. डब्याचे झाकण उघडावे तसा संसार उघडा पडतो. औरतमे इतनी हिम्मत है ! आदमीमे नही ..."
 किती खरे आहेत हे उद्गार ! जरा अवतीभवती डोळे उघडे ठेवून पहा . अशा अनेक एकाकिनी ,नवरे असलेल्या आणि नवरे नसलेल्या दिसतील. फाटक्या पदराचा आडोसा लेकरांना सावली करून देणाऱ्या. त्यांना वाढवणाऱ्या पण ही यातायात करताना त्या मात्र निष्पर्ण वृक्षासारख्या वठून जरठून गेल्या आहेत. जीवनात माणूस म्हणून जगताना , मनात उगवलेल्या इच्छा, आकांक्षा, स्वप्ने , इतक्या निर्मळपणे फेकून द्यायला कोणी शिकवले त्यांना?
 धर्माने?
 समाजाने?



जांभूळ झाडाखाली ॥५९॥