पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जांभूळ झाडाखाली



 गदरलेल्या चिंचेसारखे , गाभ्यापासून सुटून ओथंबून वाकलेले आभाळ . एवढे वाकलेले की एक टप्पोरे जांभूळ फेकून मारले तर टचकन फुटेल आणि गळायला लागेल! आकाशात गर्द सावळ्या आभाळाची खिल्लारे सैरावैरा भरकटू लागतात, तसतशा रानातल्या जांभळी तुरटगोड गरांनी गदरायला लागतात. त्यांच्या जांभुळकाळ्या रंगावर वहात्या पाण्याची नि निरभ्र निळाईची चकाकी पसरते. अशा नेमक्या वेळी आम्ही रानात जांभुळमेवा खायला आलेलो. समोर भलेमोठे जांभळाचे झाड. ऐसपैस पसरलेले. अंगभरून हिरव्याकाळ्या घोसांनी लखडलेले. दुरून पाहिले तर त्याची समृद्धी लक्षातही येणार नाही. पण जवळ आल्यावर मात्र त्याचे नांदतेपण लक्षात येते. पानागणिक घोस लोवताहेत . पण हा रानमेवा खायचा तर नजरेला हात हवेत आणि हातांना नजर हवी. आम्ही शहरी माणसं. खाली पडलेली , हाती लागतील ती जांभळं खाणारी. आतल्या आत कच्चाड तुरट चव सोशीत , 'मस्त ! छान !' असे म्हणतं, वाकडे तोंड करीत जांभूळ खाणारी! आमचे नाटक न समजण्याइतकी खेड्यातली माणसं भोळी नाहीत.
 तुरटलेली जीभ मनातल्या मनात म्हणते, बाई ग ऽ, ही असली जांभळं खाण्यापरीस, शहरातली गाड्यावरची जांभळं किती राजस अन देखणी ! हिरव्या पानांच्या नखरेल महिरपीवर सुबकपणे मांडून ठेवलेली. ती जांभूळरास पहाताना तोंडाला पाणी सुटते. फक्त भाव विचारू नका. चाळीस पेशाला एक जाभूळ. खा किती खायची ती.
 आणि इथे? वर जांभळाचे आभाळ. पायाखाली जांभळाची पखरण आणि तरीही आंबटच ! इतक्यात फांदीवर चढलेल्या पोरानं फांदी गदगदा हलवली . आणि त्याने नेमकी टप्पोरी ,जर्द जांभळी जांभळे माझ्या हातावर ठेवली. "धरा बाईसाहेब , जांभळं पारखायला अभ्यास करावा लागतो . त्यासाठी झाडांशी दुरून दोस्ती करून चालत नाही. ही संथा वयाच्या पाचव्या वर्षीच घ्यावी लागते."
 खेड्यातल्या बारक्या पोरांनाही रानातल्या जांभळी ,बोरींची चव झाडागणिकच्या वेगळेपणासह माहीत असते. त्यांच्या बहारण्याच्या सवयी, त्यांच्यात रस भरण्याचे



जांभूळ झाडाखाली ॥५७॥