पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कशी येईल? अवं त्याच्या नावानं कुकु ल्याले की चार महिने !"
 अनुबाईनं खाली बसकण मारली आणि आपल्या जलमाची चित्तरकथा तिनं सुरू केली. "आमच्या मायेला एक ईसाला कमी चार येवढी लेकरं झाली. त्यातली जगली फकस्त दोन. आमचे शिदूआण्णा मोठे. माजा लंबर खालून दुसरा. आमचे वडील देसायाच्या घरी सालदार हुते . शेतात भरपूर काम करायचे. खायला कमी न्हवतं. माझी माय एकतर गरवार असायची नाहीतर बाळातीण. लेकरू जलमताना चांगले असायचे. पन नंतर पोटाचा डबा व्हायचा नि दोन वर्षात मातीत जायचे.समदी अशीच गेली. शिदूअण्णांच्या पाठीला टेका द्यायला मीच काय ती जिती हाय. माझी माय शेतात कामाला जायची. भुईमुगाचे येल उपटायच्या कामात ती भाद्दर होती. भरपूर वाटा मिळायचा. खायलाप्यायला भरपूर व्हतं. पन शिवारात न्हाई शेत नि गावात न्हाई घर. आमच्या शिदू अण्णाला बायको कोणी देईना. तो ईसावर पाच वरसांचा झाला तरी गोसावीच ऱ्हाईला. माज्या बापाला लई घोर पडला. त्यानला वाटे. त्यांच्या समुर लगीन झालं न्हाई तर पुढे कोन पोरगी देणार? आन् तसाच पुढे म्येला तर वंसाचा दिवा कोन लावणार? त्यांना शांती कशी मिळणार? बरं शिदूआण्णा शिकलेला असता तर दिली असती कोनीतरी पोरगी. पण हा अंगठे भाद्दर. तो मोंढ्यात हमाली करी. शेवटी आमच्या धाकल्या चुलत्यांनी तोडगा काढला. त्यांच्या बायकुच्या म्हायेरी एक घोडनवरा होता. त्याची भैण न्हातीधुती होती तरी अजून बिनलग्नाची होती. चुलते म्हणाले अनशीला देऊ त्याला आन् त्याची भैन आपल्या शिदूअण्णाला करून घेऊ.
 "लगीन झालं तवा मी होते नऊ वरसांची. शिदूअण्णा होते ईसावर सात वरसांचे. मी लहान होते पण थोराड हाडाची होते. सासरी दुभतं होतं. सासू रोज सांजसकाळ मला दूध देई . बदामाचा नि वैदूच्या औषधाचा खुराक चारी. ती म्हणे, पोरगी थोराड हाये. खाऊपिऊ घातलं तर लवकर शाणी होईल. पोराला आसरांनी घट्ट धरून ठिवलं. देवऋषी लागीर यांनी उतार पडला नि तंवर पोरगी शाणी झाली तर निदान वंसाचा दिवातरी लागल. पन त्यो निव्वळ येडा होता. सांज झाली की जोरजोरात ओरडायचा. धान घान श्या द्यायचा. लई भ्या वाटायचं मला. जेमतेम महिनाभर ऱ्हाईले मी तिथे. पंचमीला म्हायेरी आले ती परत गेलेच न्हाई. माईने पोर लहान आहे म्हणून म्हायेरीच ठिऊन घेतलं. भादवा संपत आला होता. एक दिवस सांगावा आला की त्यो मेला म्हणून . लिवलं असेल, तसाच जलम जायचा! कशाला उगा घोर करून मन दुखी करायचं? तुकाराम बाप्पानं सांगितलंय न्हवं? ठेविले अनंते तैसेचि रहावे."
 अनुबाई हसत उठून कामाला लागली. चहा टाकताना माझ्या मनात आलं, संताच्या शिकवणुकीमुळे महाराष्ट्रातला पुरुषार्थ दुबळा झाला असं म्हणतात. पण हे ही खरं की त्यांच्या शिकवणुकीमुळे दीनदुबळ्यांना, बायाबापड्यांना स्वतःचं दुःख सोसण्याचं बळ मिळालं!

܀܀܀

॥ ५६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....