पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माहेरपणा करीलही. पण हक्काचा आधार शोधण्यासाठी माहेरी जाण्याचा हक्क मी गमावला आहे.
 आणि गेल्या वर्षी पस्तिशी ओलांडली मी माझ्या एम.ए. च्या डिग्रीला काय किंमत आहे या क्षणी ? नुस्ते कागद आहेत ते माझ्यासाठी. माझ्या दारुड्या नवऱ्याच्या पगारातले निम्मे तरी पैसे गौतमी अन् माझ्यासाठी मिळतील अशी कुठे आहे सोय ? आहे असा कायदा ?
 माझा नवरा क्लास वन ऑफिसर आहे. कामं कशी करायची आणि करवून घ्यायची हे तो चांगलं जाणतो. त्याचं दारू पिणं, स्त्रियांचा उपभोग घेणं हे समाजाला बोचणार कसं ? उलट त्यानं दारू प्यायलाच हवी. त्याच्या पोझीशनसाठी. अलीकडे त्याचे हात थरथरतात. शुद्धीवर असला की इतकं लाघट बोलतो की माझा ताठरपणा गळून जातो. आणि सहवासाने, संस्काराने निर्माण झालेला आपलेपणा मुळासकट करवाडून काढताही येत नाही. समजेनासं झालंय मला नेमकं काय करू मी ते !
 गौतमच्या भविष्यासाठी नवरा, घर, वैभव यांच्याकडे पाठ फिरवून, स्वतःचं अस्तित्व शोधून कर्तृत्वाची जमीन शोधून ताठ उभी राहू ? की गौतमीच्याच पालनपोषणाची आणि लग्नाचीही सोय व्हावी म्हणून फ्रीजवर ठेवलेला चकचकीत प्लॅस्टिकचा फ्लॉवरपॉट बनून इथेच राहू मी ?
 मना, हे सारं करताना गौतमीचा मी ढाल म्हणून उपयोग करतेय का? की मलाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा आहे ?
 तुझा संसार पाहून खूप तृप्त झाले मी. आता पायांखाली जमीन सापडतेय असंही वाटू लागलंय. जीवनातला फार मोठा निर्णय घेऊन तुझ्याकडे आले तर, मला हवं असलेलं घर आणि मला हवी असलेली पायाखालची जमीन मिळवून देण्यासाठी तू आणि तुझे चारुदत्त मदत करू शकाल का ?
 मन्नू, मनात जे जे आलं ते लिहून टाकलं. तुला वाटलं तर हे पण पत्र फाडून टाक. पण लिहिल्यानंतरही कसं निवान्त वाटतंय मला !
 या निवान्तपणातूनही पुढचा रस्ता दिसेल.

तुझीच
उर्मिला


 ...माझ्या हातात ते पत्र आहे.
 उर्मिलेला हवं असलेलं घर आणि जमीन देण्याचं सामर्थ्य माझ्यात तरी आहे का? आपलं घर आणि ही जमीन आपली आपणच निर्माण करायला हवी
 या कणखर जमिनीच्या आधाराची आवश्यकता उर्मिलेला आज का होईना पण वाटली.
 अशा हज़ारो उर्मिला सजून नटून काचेच्या महालात निर्जीवपणे बसल्या आहेत.



बेशरमीची झाडं ॥५१॥