पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आशार्वादाने साजरी केली. तुला आठवतं? माझं लग्न ठरलं तेव्हा आपण ज्युनिअर वी.ए ला होतो. साखरपुडयाच्या वेळी माझ्या बाबांनी पाच हजार रुपयांचा चेक माझ्या नवऱ्याच्या हाती समारंभपूर्वक दिला. मीही दागिन्यांचा घाट आणि वजन निरखण्यात गर्क होते. माझ्या लग्नासाठी वावांनी दहा हजार रुपयांचे कर्ज काढलं. पण त्यात मला काहीही गैर वाटलं नाही त्यावेळी. उलट वाटलं. मला इंजिनिअर नवरा मिळून माझा भविष्यकाळ सुखी जायचा असेल तर त्यांनी एवढा खर्च लग्नात करायला हवा. कॉलेजमध्ये येताना खुळ्यासारख प्रदर्शन करायची मी माझ्या साड्यांचं आणि दागिन्यांचं.
 लग्नानंतर उटकमंडला गेलो. नवरा, नव्या साड्या परदेशी वस्तू आणि मी. त्या पसाऱ्यात धुंद होत गेले. प्रणयाचे रंग गडद होण्यासाठी दारू हवीच हा माझा अडाणी गोड गैरसमज.
 पहिली दोन वर्षे भिंगरीसारखी गेली. गौतमीच्या वेळी दिवस राहिले आणि मी थोडा जमिनीवर उतरले.
 तीन महिन्यांच्या गौतमीला घेऊन घरी आले तेव्हा लक्षात आलं की नवरा दारूच्या कवेत गेलाय. आणि दारू घेतली की त्याला बाई लागतेच. मग ती कुणीही असली तरी चालते. मीही त्याच्या दृष्टीने वाईच होते. पण आई झाल्यामुळे माझ्यातले वाईपण हरवत चालले होते. त्याला जे हवं असे ते मला देता येत नसे. मग काय वाट्टेल ते ! कधी कधी त्याचे मित्र, त्याचे सहकारी, रात्री उशिराने त्याला घरी आणून टाकीत.
 चार वायकांच्यात जायचीही मला लाज वाटू लागली. गेल्या सहा वर्षात तर मी स्वतःला इतरांपासून खुडून घेतलंय. मध्यन्तरी धाकट्या नणंदेला जवळ ठेवून घेतलं होतं. पण तिच्या मैत्रिणीवरही याची नजर गेली.
 माझी गौतमी आता मोठी होत चालली आहे. खरं तर तिलाही खूप एकटेपणा वाटतो. पण तिला दुसर भावंड देण्याची ताकदही या दारूमुळे संपली आहे. माझ्या घरात परदेशी रेकॉर्डप्लेअर आहे, टेप आहे, मिक्सर आहे, फ्रीज आहे, खूप काही आहे... मीही आहे.
 कधी कधी वाटतं, गौतमीला या घरापासून दूर एखाद्या वसतिगृहात ठेवावं. पण तेवढाच एकुलता एक रेशमी तुकडा माझ्या जीवनात आहे. तिच्या वडिलांना सोडून, दूर कोठेतरी एकटं राहण्याचा विचार माझ्या मनात खदखदतो आहे.
 पण मना, कुठे जाणार मी? बाबा आता नाहीत. आईच हेमंताकडे रहाते. माझ्या लग्नाचे कर्ज हेमंताने फेडले. त्या दहा हजारात माझ्या उभ्या आयुष्याचं सूत्र माझ्या नवऱ्याच्या हातात देऊन टाकलं सर्वांनी. चार दिवस माहेरी गेले तर कौतुकाने वहिनी

॥ ५० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....