पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बेशरमीची झाडं



उर्मिला

 प्रिय मनू,
 तुला भेटून गेल्यापासून तुला पत्र लिहायचं म्हणतेय. पण त्यासाठीही सहा महिने घालवावे लागले. किती अचानक भेटलीस तू? भीमाशंकराच्या निमित्ताने त्या एवढ्याशा गावात मी आले. आणि लहान लहान झोपड्यांचं हॉस्पिटल आणि शाळा पाहून फाटकाच्या आत शिरले. तर काय, तिथे चक्क तू होतीस ! दोन मिनिटे डोळे फाडफाडून पहात होते मी! की खरंच तू आहेस ना? तुझं झोपडीवजा घर. आदिवासींच्या मनातला माणूस जागा करण्यासाठी रात्रंदिवस धुंद होऊन काम करणारा तुझा नवरा. शाळेत रमलेली तू. तुझ्या घरात, तुझ्या बिछान्याजवळ असलेली, सायलीच्या कळ्यांनी भरलेली नाजूक टोपली. टेबलावरचे तुझ्या मुलांचे फोटो, त्यांची पत्रं. तू प्रेमाने खाऊ घातलेले नारळाच्या दुधातले पोहे. या साऱ्या गोष्टी मला आठवताहेत. खरं तर किती कमी बोललो आपण! हातात हात घेऊन नुसत्या हसत होतो. हसण्याचा पहिला बहर ओसरून बोलायला लागणार, तेवढ्यात माझा नवरा गाडी घेऊन मला शोधत तिथे आला. घाईघाईने मला घेऊन निघून गेला. मी त्या दिवसापासून अस्वस्थ आहे. तो मला घ्यायला आला तेव्हा धड बोलण्याच्याही अवस्थेत नव्हता. तुमच्याशी किती नाटकी बोलला तो ! आठवलं तरी लाज वाटते मला. तू कुठल्यातरी बंगाली डॉक्टरांशी लग्न करणार असल्याची बातमी उडत उडत आमच्यापर्यंत आली तेव्हा आम्हाला तुझ्या नवऱ्याबद्दल खूप उत्सुकता वाटली होती. खरं सांगू ? तू हे धाडस करत आहेस त्याबद्दल अगदी खोल खोल ...मनाच्या तळात असुयाही वाटली होती. पण तरीही, असलं जातीबाहेरचं लग्न करून तू सुखी होशील असं मुळीच वाटलं नव्हतं. एका सरळ रेघेतलं मध्यमवर्गीय आयुष्य जगणाऱ्या आम्हां मुलींना तो एक अगोचरपणा वाटला होता. प्रेम करणं म्हणजे काहीतरी आचरटपणा करणं हीच आमची समजूत तोच आचरटपणा आम्हीही केला. पण आईवडिलांच्या मार्गदर्शनाखाली ! पहिली रात्रसुद्धा भटजीबुवांच्या मंत्रांनी युक्त



बेशरमीची झाडं ॥४९॥