पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शेटाणीजींना. त्यांना चार लेकी . त्याही शादीशुदा . आपल्या हिंदू समजुतीनुसार पंचकन्यांचे कन्यादान केले की फार मोठे पुण्य लाभते. मोक्षमार्गातील अडथळे दूर होतात म्हणे! आणि आवश्यक असलेली पाचवी लेक घरातच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आयुष्यभर त्यांच्याच अन्नावर वाढलेल्या आम्ही मायलेकी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. विरोध करण्याची कल्पनाही आईला सहन झाली नसती. आणि मी?
 माझं मन खूप फडफडले, तडफडले. आकाशात झेपावण्यासाठी पंखात जरा कुठे बळ येतेय असे जाणवत असतानाच पंख कापून काढावेत तशी मी. माथ्यावर अथांग पण सुन्न आभाळ. माझी आई मात्र खूप खूश होती. तिला वाटे की ती रांडमुंड बाई. पाठीला आधार नाही. पोटाला लेक मुलगा नाही. माहेर नाही. त्यात पदराशी न्हातीधुती लेक. 'तिच्यासाठी कोण शोधणार चांगला मुलगा? पुन्हा हुंड्यासाठी पैंकाअडका कुठून आणणार? शेटाणीजींच्या उपकाराखाली ती पार वाकून गेली होती.
 मीही मुकाट्याने बळी जायचे ठरवले. आधाराची आशा असेल तर आकान्ताला अर्थ! पण जिथे आधारच नाही तिथे तमाशा कशाला करायचा? सगळ्या सोपस्कारांना मी सामोरी गेले. समोर आला त्याला माळ घातली तो कोण? कसा? काही चौकशी केली नाही. सचिनचे बाबूजी चौथी पास आहेत. त्यांना मायबाप नाहीत. म्हाताऱ्या आज्याने सांभाळ केला. घर आहे. पंधरा एकर पाण्याखालची शेती आहे. वाड्यात दुकान आहे किराणासामानाचं.
 नांदेडसारख्या शहरातून या आडगावात सामशाला आले. आजेसासरा एवढा खडूस की रोज चहासाखर काढून ठेवी. सर्व सामानाला कुलूप लावी. मी पुस्तक वाचलेलं खपत नसे. एकदा मासिक वाचत होते, तर हातातला अंक चुल्हाणात फेकून दिला त्यांनी. सचिनचे वडील समंजस आहेत. त्यांना माझ्या शिक्षणाबद्दल आदर आहे. गेल्या आठ वर्षात मीही या घरात रुळले आहे . उरातल्या जखमा झाकून जगायला शिकले आहे.
 पण... पण कधी कधी जीव इतका गुदमरून जातो की, तुळशीवृंदावनाच्या तळाशी पुरलेली स्वप्नांची भुतावळ समोर येऊन नाचू लागते. शेटजी आणि शेटाणीजीला पुण्य मिळालं की नाही ते देवच जाणे! पण, मी शिकले असते तर आज कुठे असते? कोण झाले असते?"
 गाडीला ब्रेक बसावा तशी रेणू थांबली.
 मी डॉक्टर नक्कीच होऊ शकले असते. माझा नवरा कसा असेल? माझं घर कसं असेल?
 माझ्यासमोर उत्तरांच्या शोधातले अनुत्तरित प्रश्न होते. कुणाजवळ आहेत त्यांची उत्तरं?

܀܀܀

॥ ४८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....