पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तरांच्या शोधातले प्रश्न


 त्या गावढ्या गावात रेखीव अक्षरात इंग्रजी सही ठोकणारी बाई सापडेल असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. रेणुका जी. शर्मा या बाईला पहाण्याची खूप उत्सुकता दाटली माझ्या मनात. आमच्या माताबालसंगोपन प्रकल्पाच्या वतीने सामशाला बैठक होती. गावातल्या बायका झाडून जमा झाल्या. आता एवढ्या बाया गुणिले पाचपट मुले ! शेवटी मी बारक्या पोरांना गाणी गोष्टी सांगून घुलवले आणि माझ्या इतर मैत्रिणींनी बैठक घेतली. आलेल्या महिलांची यादी केली च सह्या घेतल्या. सह्या कसल्या ? अंगठेच ! तर, त्या अंगठ्याच्या घेऱ्यात ती सुरेख सही पाहून मी चकित झाले. रेणुका सहीइतकीच आखीव रेखीव होती.
 "मी पी.यू.सी. झालेय ताई. पण आता मात्र सहीपुरतं इंग्रजी शिल्लक राहिलंय माझ्याजवळ." ती दुखरं हसू ओठावर आणीत म्हणाली. तिच्या कडेवरचं बाळ खूपच रडायला लागलं. मग घाईघाईनं तिला निघावंच लागलं.
 "कधी आलात औरंगाबादला तर जरूर या घरी. ही भेट काही खरी नाही हं !"
 मीही तिला मनापासून निमंत्रण दिले.
 त्यानंतर कधीतरी तिची आठवण यायची. पण थोडीफार मीही विसरून गेले होते तिला .
 एक दिवस धुवट पायजमा, डोक्यावर टोपी, कपाळावर गंधाची टिकली, गळयात सोनसाखळी, अशा वेशातला तरुण दबकत दबकत घरी आला. आणि त्यानं चिठ्ठी दिली,


 आदरणीय दीदी,
 तुमची नेहमीच आठवण येते. पण घराच्या व्यापातून कुठली आलीय सुटका ? येत्या रविवारी आमच्या शेतावर हुरडा खायला मुलांसह या. दुपारचं जेवण माझ्या घरीच घ्या, मी मनापासून वाट पहातेय.

तुमची
रेणुका जी शर्मा.



उत्तरांच्या शोधातले प्रश्न ॥४५॥