पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 एकदा सरकारी दवाखान्यात मैत्रिणीला भेटायला गेले तर अचानक शोभा दिसली. मीच हाक मारून तिला बोलावले. माझ्या मनातली उत्सुकता सुळकन बाहेर आली
 "झाली शिक्षा नवऱ्याला?" माझा प्रश्न.
 न्हाई ताई, नवऱ्यानं मला मारलं न्हाई, मीच पाय घसरून दगडाच्या दरडीवर पडले अन मार लागला असा सायवांसमूर खोटा जबाब दिला ! सायबांनी इचारले की पोलिसासमूर का खोटं बोलली ? तशी सांगितलं की आजूबाजूच्या बायांनी तसं बोलं म्हनून मला गळ घातली. मग काय दिलं सोडून त्याला." शोभा खाली मान घालून बोलली.
 ती बोलताना चेहरा खूप पडलेला असावा "त्या आया बाया कोण ? मी तर नव्हे ?" असा प्रश्न विचारावासा वाटला.
 माझ्या जरा जवळ येऊन ती हलक्या आवाजात सांगू लागली. "ताई, त्या पिंजऱ्यात हुबं हाईल्यावर माज्या लक्कन मनात आलं. तो जर का तुरुंगातून सुटून भाईर आला नि मगं माझ्या सोनीला त्यानं मारलं तर? नाहीतर मलाच मारून टाकलं तर ? त्या रेड्याचा काय भरवसा ? तुम्हाला वाईट वाटलं म्हनून मी तिकडे आले न्हाई. तिकडची कामं सोडून दिली."
 मी सुन्नपणे रस्ता कापत होते. अचानक मला आठवले. एक प्रश्न विचारायला विसरले होते मी. मला विचारायचे होते. “शोभा, पण सध्या तू कुठे राहतेस ? बापाकडे की नवऱ्याकडे ?"
 पण दुसऱ्याच क्षणी मनात आले. बरं झालं प्रश्न विचारला नाही ते. तेवढीच माझ्या मनावर फुंकर ! कुणी सांगावं ? की तिच्या.

܀܀܀

॥ ४४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....