पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पास झाल्यावर काय करायचं यावर वोलण्यात तिला खूप रस वाटे. त्याबद्दल बोलताना लागली की तिचे डोळे चमचमायला लागत. चौथी पास झाल्यावर ती चहाचे छोटेसे दुकान घालणार होती. किंवा मी तिला एखादे चांगलेसे सावलीतले काम लावून देणार होते. शोभा आता खऱ्या अर्थाने वयात येऊ लागली होती. तिच्या डोळ्यातल्या कोवळेपणावर स्वप्नांची मऊ साय धरू लागली होती .
 तशातच एक दिवस -
 एक दिवस सकाळी तिचा मुका बहिरा भाऊ घरी आला. चित्रविचित्र आवाज आणि खुणा करून सांगू लागला. मला ते काही उमजेना. मी शेवटी पायात चप्पल सरकावून त्याच्या मागे गेले.
 पोलिस चौकीत जाण्याची माझी ही पहिलीच वेळ. क्षणभर वाटले होते की फिरावे मागे . पण मी आत गेले. चौकीच्या ओट्यावर शोभा वसलेली. चेहरा सुजून भोद झालेला. पुढचे दोन दात पडलेले. तोंड रक्ताने लडवडलेले. हातावर ओरखडे कपाळावर जखम कपडे फाटलेले. शेजारी दीनवाण्या चेहऱ्याचे म्हातारे वडील. मला पहाताच तिचा बांध फुटला. ती धाय धाय रडू लागली. धड वोलता येईना.
 शेवटी तिचे वडील सांगू लागले. "ताई, आठ दिवसापासून शोभाचा नवरा आमच्याकडे चकरा मारू लागलाय. ती भटकभवानी काय सौंसार करनार व्हती का लगनाच्या वायकूवानी? चारदीस रंगढंग केले नि गेली निघून. तवा या दादल्याला आठवण झाली हक्काच्या बायकूची शोभा काही तयार हुईना त्येच्याकडं जायला. मी म्हनलं तिला बाईमानसानं लई वढून नाई जा घरी, पण हिला ते नगं वाटतं. तिला काय की ती शाळंत परीक्षा द्यायची म्हनं. ती म्हटली की त्यानं टकुऱ्यात काठी हाणली. लई मारलंय माज्या पोरीला. ते न्हानगं पोर घेऊन मी पळालो म्हनून ते जितं राहिलं. जावाई कसला रेडा हाय रेडा, माजलेला !"
 शोभाची वैद्यकीय तपासणी करून घेतली. रीतसर तक्रार नोंदवली, मार खूप लागला होता. कोर्टात केस सुरू झाली,
 अशात शोभा गप्प असे. कुठेतरी एकटक नजर लावत राही. पहिल्यासारखी मोकळेपणानी बोलत नसे. तिच्या मनात काहीतरी खळवळ असावी. तिला कोर्टाचे विलक्षण भय वाटे. खरे तर मलाही वाटायचे. पण मी तिला धीर देई. तिने धिटाईने, न घावरता साक्ष द्यावी म्हणून पटवत असे. अखेर साक्षीचा दिवस उजाडला.
 संध्याकाळी शोभा मला भेटायला येणार होती. ती आलीच नाही. ते दिवस होते संक्रांतीचे सणवार, हळदीकुंकू या गर्दीत मीही बुडून गेले.
 दिवस उलटले. महिने उलटले. शोभा आलीच नाही. मनातून तिची याद येई. पण शोधणार तरी कुठे ? आणि माझ्यासारख्या बाईने झोपडपट्टी धुंडाळत हिंडणे जरा अवघडच ना! मग मीही तिला मनाच्या मधल्या कप्प्यात बंद करून टाकले.



फुंकर ॥४३॥