पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 शोभाचा वाप साधा हमाल: शिवारात नाही शेत आणि गावात नाही घर. अशा भणंगाला वायको कोण देणार? वयाच्या पन्नाशीपर्यंत तो विनवायकोचा राहिला. मजुरी करून साठवलेले पैसे शोभाच्या मामाच्या खिशात पडले तेव्हा शोभाच्या वापाला तरणी बायको मिळाली. पण तिला हा म्हातारा नवरा कसा आवडणार? काही उमजेसमजेस्तवर दोन लेकर झाली. पण तिचे मन कधी घरात गुंतले नाही. तिला तरणावांड जोडीदार मिळताच या दोन पोरांना म्हाताऱ्याच्या दारात टाकून ती पळून गेली. बाप आडतीतली पोती पाठीवर वाहून वाहून पोक्या बनला होता. पोरांसाठी तो खूप कष्ट करी. पण शोभा जसजशी वाढू लागली तसा त्याच्या जीवान धसका घेतला. त्याला बाटे, घरात बाई माणूस नाही. उद्या पोर न्हातीधुती झाल्यावर तिच्यावर कोण नजर ठेवणार ? या भीतीने त्याने शोभाचे शहाणी होण्यापूर्वी, वयात येण्यापूर्वी लग्न लावून दिले आणि तो असा मोकळा झाला. खेड्यापाड्यातले बहुतेक वाप असेच मोकळे होत असतात.
 शोभाचे सासर गावातच आहे. नवरा रेल्वे लाईनीपलीकडच्या झोपडपट्टीत राही. तो मालमोटारीवर किन्नर म्हणजे क्लिनर होता. शोभा वयात आली आणि दीड वर्षात तिला लेकरू झाले. नवरा गाडीबरोबर गावोगाव हिंडायचा. एकदा गाडी लाईनीवर धावू लागली की पंधरापंधरा दिवस तो बाहेर राही. घरात अजाण वायको. जेमतेम चौदापंधरा वर्षाची. त्यातून गरवारशी. त्याने बाहेर कुणाशीतरी संधान बांधले. एक दिवस घरी परत येताना त्या वाईला घेऊनच आला. शोभाला त्याने वजावले, "हिला मोठी भन मानून घरात न्हाईलीस तर भाकरतुकड्याला कमी करणार न्हाई. अंगभर ल्यायालाबी मिळंल पन हिच्याम्होरं श्यानपना केलास तर याद राख."
 "ताई, ते दोघं गुलुगुलू वोलत, चावटपणा करीत. त्या येका झोपडीत मी डोक्यावर पदर घेऊन पडून न्हाई. पुढे लेकरू झालं ते रडाया लागलं की नवरा म्हणे बाहिर बेस. त्यानला रडण्याचा तरास होई. दारातल्या कुत्रीवाणी शिळेतुकडे खाताना जीव नकुसा वाटे. एक दिवस दहा दिवसांचं लेकरू घेतलं नि बापाच्या घरी आले. पन वाप असा म्हातारा. दुसऱ्या दिवशीपासून गवंड्याच्या हाताखाली कामाला जाऊ लागले. बसून कोन खाऊ घालणार गरीबाला ?"
 मी सोळाव्या वर्षी पुण्याला कॉलेजात गेले तेव्हा माझ्या आईला प्रश्न पडला होता की माझ्या कुरळ्या केसांच्या दोन वेण्या कोण घालणार त्या हॉस्टेलात ?
 हळूहळू शोभा आमच्या घरात नि माझ्या मनात रुळू लागली. ती कामावर येताना बाळ आमच्या ओट्यावर विनधास्त झोपवी. शिवाय मधल्या सुट्टीत भराभरा भाकर खाऊन माझ्याकडे येई. जुनी पाटी नि पेन्सिल घेऊन लिहायचा सराव करी. तशी ती तिसरी झालेली होती. पेपर हातात घेऊन अक्षर लावून वाचत बसे. ती चौथींची परीक्षा देणार होती. एका प्रौढसाक्षरता वर्गात मी तिचे नाव लावून आले होते. चौथी

॥ ४२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....