पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोरीला लेकराची काय सुदबुद हाय का नाय ? समूरच्या डागदरीनताई लेकरु घिऊन हितवर आल्या. आत्ता काय म्हनावं या बाईला ?"
 तो तणतणतोय इतक्यात, सिमेंटच्या काल्याने माखलेली शोभा कसनुशा चेहऱ्याने आली. आधी मळलेल्या लुगड्याला हात पुशीत तिने लेकरू माझ्या हातातून घेतलं जरा बाजूला आमच्याकडे पाठ करून ती बसली. क्षणभरात बाळाचे रडे थांवले.
 "ये भवाने, ते प्वार तुज्या म्हाताऱ्या बा जवळ ठिऊन येत जा. ते बारकं पोर घेऊन येतीस नि त्येच्या निमित्तानं कामचोरपना करतीस तुजी कीव केली तर तू लईच डोक्यावर बसाया लागलीस लेकरू तिथं कशाला निजिवलं ? एवढ्या मोठ्या घरच्या बाईनला उगाच तरास."
 "छे ! मला कुठला आलाय त्रास ?" मी मुकादमाचं बोलणं अडवीत बोलले.
 शोभाने माझ्याकडे पाहिले. त्यात आपलेपणाची चमक होती. कपाळावरचा घाम चुंबळीच्या फडक्यानं पुशीत ती बाळाला पाजीत होती. त्या दगडविटामातीच्या गोंगाटात, बाळाच्या दूध पितानाच्या तृप्त हुंकाराची आदिम लय माझ्या मनाला स्पर्शून गेली आणि मी नकळत म्हणाले, "अगं, झाडाखाली एकटं लेकरू कसं झोपवलंस ? घराच्या व्हरांड्यात झोपवायचंस. हाक तरी मारायचीस मला."
 खरे, मी असे म्हणाले पण खरोखर ती लेकरू ठेवायला आली असती तर, मनाच्या आतून भावले असते मला ? माझ्या बोलण्यावर तिचा विश्वास बसलाय असे तिच्या संकोचलेल्या हसण्यातून मला मुळीच जाणवले नाही. तो नक्कीच वाटला नसणार.
 पण एक दिवस अचानक वळीवाचा पाऊस खुळ्यासारखा कोसळला. रस्त्यावर पाणीचपाणी. अंगण चिखलानं भरलं. त्या दिवशी दुपारी शोभा बाळाला व्हरांड्यात झोपवून गेली पुस्तके वाचतावाचता नि पेपर चाळता चाळता त्या बाळाकड़े नजर टाकणे अगदी सोपे होते. आपल्या मनाला कोणत्यातरी कोपऱ्यातून ते सुखावणारे आहे, हे मला उमजले.
 माझ्या अठरा वर्षाच्या मुलाचे लहानपणचे कपडे मी त्याच्या मुलाला हौशीने घालण्यासाठी जीवापाड जपून ठेवले होते. ते मी कधी खाली काढले कोण जाणे. ते बाळही मला आता छान ओळखू लागले. त्या नव्या जुन्या कपड्यांचे अप्रूप त्याच्या आईला वाटले. अठरा वर्षापूर्वीचे ते दुभते दिवस पुन्हा एकदा याद देऊन गेले !
 मग शोभाची नि माझी ओळख चांगली दाट होत गेली.
 शोभाचे वडील मोंढ्याजवळच्या झोपडपट्टीत रहातात. ते खूप म्हातारे आहेत. तिचा भाऊ किसन्या मुका आणि बहिरा आहे. शोभाची माय, शोभाच्या म्हाताऱ्या बापाजवळ रहात नाही. तिने दुसरा घरोबा केलाय. ती सिग्नलकँपात रहाते. ती दुसऱ्या माणसाबरोबर पळून गेली तेव्हा शोभा होती सात वर्षांची आणि किसन्या चार वर्षांचा.



फुंकर ॥४१॥