पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुंकर



 रस्त्याच्या पलीकडे कुणाच्यातरी घराचे बांधकाम सुरू होते. वैशाखाचे ऊन अंगात टचाटचा लागेपर्यंत सारे मजूर काम करीत आणि दुपारी साडेबाराच्या सुमारास भाकरतुकडा खायला माझ्या घरासमोर चिंचेखाली येत.
 जेवणखाण आटोपून, स्वैपाकघर नीटनेटके झाकूनपाकून जरा आडवी व्हायचा विचार करतेय तोच कोणीतरी हाक घाली. "ताई, चरवीभर पाणी या प्यायला."
 पुन्हा थोड्या वेळाने कोणीतरी हाक घाली .
 "ताई, चरवी ठिवा आत. अन् दार बी वढून घ्या . आमी चाललाव कामावर."
 त्या वैशाखी उन्हात डोळ्यांवर अशी छान झापड येई की मीही चरवी नेणारे आणणारे कोण , कुठले याची दखल घेत नसे. पण त्या आवाजातला आश्वासक ठाकर स्वर माझ्या खूप परिचयाचा झाला होता.
 एक दिवस बाळाच्या केकाटून रडण्याच्या आवाजाने मी दचकून जागी झाले नि बाहेर आले. तर झाडाच्या विरळ सावलीत एक चिमुकले बाळ अंगावरचे पटकूर हातापायाने झाडीत कळवळून रडत होते.
 बाळाची आई कुठेय म्हणून इकडेतिकडे नजरेनेच शोध घेतला. तर अवतीभोवती कोणीही नाही.
 आता बाळाला उचलणे भागच पडले. डोक्याला गोंड्याचे टोपडे नि, अंगावर गुंडाळलेली जुनीपानी कुंची. झिजून चिंधाटलेली.
 कुबट वास येणारी गोधडी अंगाखाली. तिचाच एक पदर अंगावर टाकलेला. त्या चिंधाटलेल्या गोधडीत रडून रडून लाल झालेला तो तांबडा गोळा. जेमतेम पंधरावीस दिवसांचा.
 मी ते बाळ हळूच उचलून घेतले. बांधकाम सुरू होते त्या घराकडे रस्ता ओलांडून गेले.
 मला नि माझ्या हातातल्या त्या बाळाला पाहून कामावरचा मुकादम क्षणभर गरून गेला. दुसऱ्याचा. क्षणी त्या लेकराच्या आईच्या नावाने ओरडू लागला.
 "शोभ्ये ये शोभ्ये ऽ कुठं उलथली की वाई , अरं बगा रं जरा त्या तरवड्याच्या

॥ ४० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....