पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "शेवंताबाई, तसं नगं म्हणूस हितं माझ्या शेजारी ये आनि चा पी. पोटची लेक आज दूर ऱ्हायली तू पोटची होऊन सेवा करतीस. लेकीचा बाट माईला कसा गं व्हईल ? आपन मानसासारखी मानसं हातापायांनी सारखी, उगा देवानं काहीतरी मागं लावलंया म्हणून जातपात पाळायची. आता देवाच्या दारात बसलेली मानसं आम्ही आम्हाला कसला आलाय विटाळ नि चांडाळ ?"
 शेवंतामावशीला जवळ बसवून एका चटईवर दोघी चहा प्यायल्या.
 वयाच्या पंच्याहत्तरीनंतर मनाला पटलेला हा विचार त्यापूर्वी कधी सुचलाच नसेल का त्यांना? आणि सुचणार तरी कसा? त्यांनी आयुष्याच्या अखेरीला शोधलेली ही उत्तरं त्यांना तरुणपणात सुचली नसतील का ? आणि सुचणार तरी कशी? हातभर घुंगटा आडून बाहेरचं आभाळ पहाण्याची संधी मिळाली असेल का त्यांना ? आपल्याच प्रश्नांना आपणच दिलेली उत्तरं, मुखावाटे बाहेर पडायला सत्तरी ओलांडावी लागते .
 असेच घडणार असेल तर मग आपल्या तरुणाईचे संदर्भ वर्तमानाशी कधी जोडणार आपण ? आणि कसे ?
 आज धर्मांधता विरोधी परिषदेची धावपळ करताना, रोजची वर्तमानपत्रे वाचताना या नि अशा अनेक आठवणी आठवतच राहतात.
 पण आठवणी नुसत्या आठवत बसून कसे चालेल? मोहसिना आणि दादीजींच्या मनातले, जीवनातले प्रश्न माझेही आहेतच की !
 ते सोडवायचे तर त्यांचे हातही हाती हवेत.
 हे जग आपल्या दोघांचे आहे. स्त्री पुरुषांचे आहे !
 हे प्रश्नही आपल्या दोघांचे आहेत !

܀܀܀



मोहसिनाची सल ॥३९॥