पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पण खरंच पटेल ना ?

   
लेकीची बाट माईला !

 माझ्या सासूबाई वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी आमच्या घरी रहायला आल्या.
 मी कॉलेजातून घरी आले तर दादाजींच्या खोलीत दादीजींचाही पलंग टाकलेला.
 मला जवळ बोलावून त्यांनी सांगितलं, "चटण्याफिटण्या करून इथे माझ्या जवळच्या देवळीत ठेव. सकाळी कालिजात जाण्याअगुदर दोन दुधातल्या दसम्या टाकून माझ्या उशाशी ठिवत जा. दसम्या, दही-दूध, चटणी मला चालतं आणि भावतंही ! म्हाताऱ्याला तुझ्या नि तुझ्या बाईच्या हातचा वरणभात, स्वयंपाक चालेल. पुरुषांचं बरं असतंया. त्यांनी देवधर्म नाही केला तरी देव रागावत नाही. पण बायांचं तसे नसते गं. त्यांना समदं पाळावं लागतं. सोताचं नि नवऱ्याचं पन."
 हा दशमी, चटणी, दह्याचा रोजचा वरवा नेमका कधी बंद झाला आठवत नाही.
 एकदा पुरण केलं होतं. नानीनं दादीजींना पोळी खाण्याचा आग्रह केला. पोळी खाण्याचा. मग पुरणात दुधाचा थेंब टाकून ते जेवण चाललं. असं करता करता दादीजी घरात छान रमल्या. आमची शेवंतामावशी दोघा म्हाताऱ्यांची सेवा मनोभावे करी. हौशीने म्हाताऱ्या केसांची जुडी बांधून देई. पायाला तेल लावून वाटीनं घाशी. दोघींची घट्टमिट्ट गट्टी जमली. दादाजींची सेवा सून - लेक काय करतील अशी सेवा करी.
 एक दिवस एक म्हाताऱ्या बाई दादीजींना भेटायला आल्या. बोलताना तेढा सवाल विचारून गेल्या. "तुमची सून तर जातपात पाळत न्हाई. करमतं का इथं ? बरं निभतं का ? आणि इथेच राम म्हटलात तर आम्ही रडायला कुठं यावं ? इथं की मोठ्या घरी ?"
 दादीजींचे आंधळे डोळे भरून आले. त्याही तितक्याच तेढेपणाने उत्तरल्या. "जलमताना जात कपाळावर लिहून तर देव पाठवत नाही. आणि माझ्या लेकराच्या घरी एवढी सत्ता असताना मला न करमाया काय झालं ? आता रडायचं म्हणाल तर, आप मेलं नि जग बुडालं. मी थोडीच पहायला येणारेय की तुम्ही रडता आहात की नाही ते! आणि खरंखुरं रडता की नाही ते!"
 त्यानंतर काही दिवसांची गोष्ट. दुपारचा चहा मी केला नि पितळीत घालून दादीजींच्या जवळ चटईवर ठेवला. दादीजींच्या हाताला ती पितळी दाखवून दिली. दादीजींचे डोळे पूर्ण विझले होते. पितळी अधरपणे हातात पकडताना त्यांनी नेहमीचा प्रश्न केला. "शेवंताबाई, तुबी चा घेतला जणू ?"
 "व्हय बाई. मी बी चा घेतेय. पन तुमच्या चटईवर मी बसल्याली न्हाई बरंका. तुमी बिनघोर चा प्या. " शेवंताबाईनी उत्तर देताच दादीजींनी चहा चटईवर टेकला

नि हातांनी शेवंताबाईला चाचपडू लागल्या.

॥ ३८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....