पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

है. " क्षणभर मनाला चुटपुट लागली, कधीही न भेटणाऱ्या सग्यासोयऱ्यांना किमान डोळ्यात साठवून घेतले असते. जयपूर आले. मी खाली उतरले. घड्याळ्यात पहाटेचे पाच वाजले होते.
 दहा दिवस, दहा प्रांतातल्या पन्नासजणींनी राष्ट्रीय एकात्मतेवर किसून किसून चर्चा पाडली.
 मग जयपूर दर्शन झाले. आमेरचा किल्ला पहाणे झाले. जयपूरच्या बाजारातून खरेदी झाली. अनेक मैत्रिणी मिळाल्या. एकमेकींचे पत्ते घेतले. एलीस गर्गच्या बालरश्मी संस्थेचे काम पाहिले.
 परतीची वाट धरताना डोळे ओले झाले. पुन्हा भेटण्याचे मनसुबे झाले.
 आणि हातीपायी धडधाकट, सुखरूपपणे, (त्या डायरीची गरज न लागता) होय, मी सुखरूपपणे घरी येऊन आता महिना लोटला आहे.
 गेल्या काही दिवसात रोज कानावर येणाऱ्या बातम्या, रोज रोज मारली जाणारी निरपराध माणसे, जातीजमातींचे राजकारण, त्यातून होणारे दंगेधोपे ... हे सारे ऐकून मग उद्विग्न होते. उदास होते.
 आणि आठवतो तो आगगाडीचा डबा. त्या डब्यातली आपली माणसे. कालवलेल्या दूधभातासारखे ते पंधरा सोळा तास.
 अशा वेळी मनात येते. धर्माच्या ठेकेदारांच्या आणि सत्तेसाठी देवघरातले देवही चौरस्त्यावर विकायला काढणाऱ्यांच्या कोलाहलात, माझ्या देशाचा हरवलेला आत्मा शोधण्यासाठी रेल्वेचा डबा नाहीतर एस. टी. ची धावती बसच गाठावी लागणार का ?

܀܀܀



रेल्वेच्या डब्यातील आत्मा ॥३५॥