पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

है उसके बिवीबच्चे बेसहारा होते है."
 "मरनेवाले मुसलमानभी गरीब होते है और मरनेवाले हिंदूभी गरीब होते है. " चाचा बोलत होते.
 इतका वेळ डोळे मिटून पदराखाली जपमाळ जपणाऱ्या माँजीही बोलू लागल्या, "लाखोमे एक बात कही भाईसाबने !"
 माँजी सध्या मध्यप्रदेशांत उज्जैनला मोठ्या मुलाजवळ असतात. पण त्या मूळच्या राजस्थानच्या सीमेवरचे एक लहान खेडे, त्यांचे माहेर, सासर जवळच. आजही त्यांचे मोठे दीर गावी शेती करतात. त्यांच्या घरात दोन पिढ्यांपूर्वी मोठ्या मुलाला सिख्ख करीत. देवघरात आजही गुरुनानक साहेबांचा फोटो असतो. ग्रंथसाहेबातली पदे अनेक मुखांतून गायली जातात.
 "सिख्ख लोग तो हमें अपने लगते है. अपने बिरादरीके लगते है. कभी नही सोचा था की ऐसा कुछ होगा" माँजींचा स्वर कातर झाला.
 एव्हाना रेल्वेच्या डब्यातला तो कोपरा, एक घर बनला होता.
 मागे मागे पळणारी झाडे, हरियाली शेते आता अंधारात बुडू लागली. बरोबरच्या शिदोऱ्या पिशवीतून बाहेर येऊ लागल्या. कुठलेसे स्टेशन आले आणि मी पुरीभाजीवाल्याला शोधू लागले. इतक्यात त्या तरुण आईने मला आत बोलवले. आग्रहाने विनवले. "दीदीजी, हमारे पास बहुत सारा खाना है. आप हमारे साथ खाना खाओगी. प्लीज." तिच्या नवऱ्यानेही आग्रह केला.
 "दीदीजी, संकोच मत करना. रास्ते मे मिल गये है. चंद घंटोके साथी है. मालूम नही आगे कब मुलाकात होगी !"
 उत्तरेकडचा लोभस आग्रह मानावा लागला. मी द्राक्षे घेतली आणि मधे ठेवली. मग लोणच्याची देवाणघेवाण झाली. चाचाजींनी चार बुंदीचे लाडू आणि शेव कागदावर काढून मध्यात ठेवली.
 "पक्की रसोई है बहेनजी. तीखी सेव और नुक्तीके लड्डू है. आप सब लीजिये."
 मग इकडून तिकडून तिखट पुऱ्या पास झाल्या. भरल्या बटाट्याची भाजी सगळीकडे फिरली.
 "भाईसाब, मै किसीके हाथ से बनाया नही खाती.. पुरं आयुष्य याच वाटेनं गेल. नवे विचार मनाला पटतात. पण वाटतं, उरलेल्या चार दिवसांसाठी कशाला नवा रस्ता धरू? मी चार द्राक्षं घेते. मी तुमची रसोई खाल्ली नाही तरी लौकीचा ...दुधी भोपळ्याचा हलवा मात्र तुम्ही खायला हवा !" असं म्हणत त्यांनी सर्वांना चवदार हलवा दिला. शेजारच्या तरुण मुलाने खाली उतरून सर्वांसाठी पाणी आणले. पहाटे पहाटे जाग आली त्या तरुण मुलाच्या आवाजाने. "दीदीजी, जयपूर आ गया. आप गहरे नींदमे थी. चाचाजी और माँजीने आपको याद दी है. वे अजमेर उतर गये

॥ ३४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....