पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रत्येक क्षणी देणारा तू आज दू S र गजाआड बंदिस्त... शब्द माझे..पण मनाची उलघाल तुझीच.. माझ्या प्राणातला कोमल गंधार तू कोवळ्या शब्दांनी जपला आहेस. तीव्र मध्यमाचे कणखर स्वरही माझेच प्राणांना शोष पडला. तरी विझू देणार नाही मी ते !'(६६).
 त्याचबरोबर सामाजिक पातळीवर एकीकडे होणारी जागृती आणि दुसरीकडे पारंपरिक मानसिकता यांच्यात चाललेल्या संघर्षाचे व सामंजस्याचेही दर्शन व्यक्तिचित्रांमधून सहजपणे समोर येते.
 "बदलल्या काळासोबत मोकळ्या आभाळाखाली येण्याऐवजी बाई अधिकच गुदमरत चालली आहे." (५९).
 "मी आई झाल्यामुळे माझ्यातले बाईपण हरवत चालले होते." (५०).
 "नवे विचार मनाला पटतात पण वाटतं. उरलेल्या चार दिवसांसाठी कशाला नवा रस्ता धरू?" (३४)
 "पोटची लेक दूर राहिली. तू पोटची लेक होऊन सेवा करतीस. लेकीचा बाट माईला कसा गं व्हईल? आपन मानसासारखी मानसं. हातापाया सारखी. देवानं काहीतरी मागं लावलंय म्हणून जातपात पाळायची. आता देवाच्या दरात बसलेली माणसं आम्ही. आम्हांला कसला आलाय विटाळ नि चांडाळ?" (३९)
 "शिक्षण वाया जात नाही. शिकली तर नवराबी शिकलेला मिळेल. नवऱ्यानं पीठ आणलं तर बाईनं त्यात चिमूटभर मीठ घालावं. म्हंजी भाकर चवदार हुती."
 शैला लोहिया यांच्या व्यक्तिमत्वातील काव्यात्म संवेदनाशीलता आणि सामाजिक समस्यांबद्दलची त्यांची जाण या दोहोंचा सशक्त मेळ घालणारा हा ललित लेखसंग्रह आहे. सामाजिक क्षेत्रात केवळ विचारकल्पना मांडूनच त्या थांबलेल्या नाहीत. त्या विचारकल्पनांना पतीच्या सहकार्याने गेली तीसपस्तीस वर्षे कृतीतही आणत आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्या कामाची दखल घेतली गेली आहे. त्यामुळे या लेखांतील शब्दाशब्दामागे एक प्रकारचा ठाम विश्वास आहे. स्नेहभाव आहे. वाचकांनाही त्याचे आकर्षण वाटेल यात शंका नाही.

शंकर सारडा