पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोताची तरतरीत पानं आणि पानांच्या दुहेरी कडांनी डोकावणारे तीक्ष्ण काटे आठवतात. (सोनकणीस पृष्ठे ८२)
 आकाशमोगरी. मोगरीसारखी राजहंसी. फुलांचा बांधा उभार. पण टोकावर घेरदार कळी. मोगरीच्या कळीसारखी कबुतरी, घुमारलेली. रंगही शुभ्र, किंचित लालच झाक. पाकळ्या रेखीव, एकाला एक जोडलेल्या. दाटीवाटी नाही. जिथल्या तिथे फुललेल्या. पाकळ्या नितळ, तरीही काश्मिरी गालिच्यासारख्या दडस. दोन बोटात धरून एकेक पाकळी चिरमळायची आगि फू फू करून फुगवायची. छान फुगा फुगतो. लगेच कुणाच्या तरी कपाळावर टचकन फोडायचा. बुचाच्या फुलांतला मध देठाच्या पुंगळीतून चोखताना मज्जा यायची. लांबच लांब देठातून सुक सुक आवाज करीत मध ओढायचा. जेमतेम जिभेवर उतरेल इतकाच थेंब. पण स्ट्रॉमधून कोकाकोला पिण्यापेक्षाही त्याची लज्जत न्यारीच. (आकाशमोगरी पृष्ठ १६)
 अशी ऐंद्रिय संवेदनांना कुरवाळणारी चित्रदर्शी काव्यात्म वर्णने करताना शैला लोहिया यांच्या जातिवंत निरीक्षणशक्तीची आणि तरल शब्दकळेची जणू जुगलबंदीच चालते. या निरीक्षणांना लोकसाहित्याच्या सांस्कृतिक संदर्भाची जोड मिळते आणि त्याची आवाहकता अधिकच व्यापक होत जाते. "विरहवेदनेचे विखारी अमृत मी प्याले-उर्मिलेच्या थरथरत्या हातांनी! ते पिताना ठसका लागला तेव्हा पाठीवरून हात फिरले वनवासी सीतामाईचे. सुरकुतलेले शुष्क हात. भोवंडून उडू पहाणाऱ्या जीवाला घट्ट सावरून धरले मीरेच्या एकतारीने. पुराचे पाणी वाहून जावे तशी वाहून जाणारी वर्षे. पण मी मात्र तशीच. एकाकी नुस्ती वाट पहाणारी." (मी युगविरहिणी) (पृष्ठ १०२) यासारख्या आत्मनिवेदनपर क्षणी, आणीबाणीच्या काळात गजाआड असणाऱ्या पतीच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवशी आपल्यासारख्याच विरहिणीच्या रूपातल्या उर्मिला, सीता, मीरा दिसतात; आणि आपल्या व्यथावेदनेत त्यांचीच रूपे दिसतात. अशा सांस्कृतिक आणि वाङ्मयीन एकतानतेमुळे या भावभावनांचे आवाहन केवळ व्यक्तिगत न राहता, विश्वात्मक होते आणि प्रत्येक विरहिणीचे ते प्रतिनिधित्व करते.
 अनेक हृद्य व आकर्षक कल्पना आणि भाव या लेखांमधून सहजपणे सूत्रात्मक अल्पाक्षरी शैलीत प्रकट होतात, आणि आपल्या मनाच्या तारांना झंकारत राहतात.
 "अधमुऱ्या गोल दह्यासारखं आमचं वय होते."
 "जाळीदार पडद्याआडून पल्याडचे भास जाणवावेत तसे सासर-माहेरचे वेगळेपण आम्हाला जाणवे."
 "आषाढाचं नवेपण दरवर्षी नव्या तऱ्हेनं साजरं होई यक्षपत्नीच्या वेदनांचे मुके वळ आज माझ्या तनामनावर उभरले आहेत. मुक्तीचा नवा प्रत्यय