पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

धर्मानं? समाजानं ? की त्यांच्यातल्या मातृत्वानं ?
 स्त्रीजीवनाच्या अशा वेगवेगळ्या अंगांना व समस्यांना प्रत्यक्ष स्त्रियांच्याच कहाण्यांद्वारे शैलाताई स्पर्श करतात. त्या समस्यांच्या जटिलतेची जाणीव देतात. आपली पारंपरिक मानसिकता, सामाजिक व आर्थिक चौकटीची जाचकता आणि एकूणच परिस्थितीची अपरिहार्यता यांच्या प्रचंड दबावाखाली आजच्या महिलांना जगावे लागत आहे आणि शिक्षण, आर्थिक स्वावलंबन, स्वातंत्र्य या संभाव्य उत्तरांच्या मर्यादाही ध्यानी येत आहेत.
 शैला लोहिया यांच्या सामाजिक जाणिवा प्रखर आहेत, त्यांच्या काव्यात्म संवेदनाक्षमतेची तरलताही वेधक आहे. निसर्गाच्या, ऋतूचक्राच्या विविध विभ्रमांनी त्या अंतर्बाह्य प्रभावित होतात, भावनात्मक आणि वाङमयीन पारंपरिक संदर्भानी समृद्ध अशा वसंत, हेमंत, शिशिर, वर्षा इत्यादी ऋतूंचा तसेच आषाढ, श्रावण, भाद्रपद आश्विन वगैरे महिन्यांतील सणउत्सवांचा वेध घेताना त्यांची शब्दकळाही बहरून येते.
 "गर्द सावळ्या आभाळाची खिल्लारे सैरावैरा भटकू लागतात, तसतशा रानातल्या जांभळी तुरटगोड गरांनी गदरायला लागतात." (जांभूळ झाडाखाली, पृष्ठ ५७)
 आश्विन थंडीबरोबर रानातल्या तुरीवर पिवळा फुलोरा लागतो. नवी साळ तयार होत आलेली असते. अशा वेळी येणारा हा भुलाबाईचा उत्सव म्हणजे जणू भूमीच्या उर्वरा शक्तीच्या, तिच्यातील सर्जनशक्तीच्या सत्काराचे प्रतीकच ! ( हा भाद्रपदाचा महिना, पृष्ठ ७२)
 उन्हाचे बाभूळ आता चांगलेच फोफावलंय. अशी लखलखीत उन्हे की पहाता क्षणी नजर भाजून निघावी. अशा या उन्हात दारासमोरच्या गुलमोहराचे लालचुटूक छप्पर नजरेला थोडा थंडावा देते. एक थंडगार गंधदार झुळूक घामेजल्या अंगावर कुंकर घालून जाते. मान्सून ढगाचे गडद सावळे छायाचित्रच समोर दिसले आणि माझ्या नाकाला मातीचा खमंग गंध - आकाश आणि माती यांच्या पहिल्या भेटीचा मादक गंध हुळहुळून गेला. (आंब्याच्या कोयीवरून घसरताना, पृष्ठ ७३)
 मृगाच्या स्पर्शानी या काटेरी वनाला जाग येते. बोचऱ्या काट्यातून तरल चैतन्याचे पाट वाहू लागतात. त्या उन्मादाच्या भरात, गंधवती धरेच्या कणाकणातला सुगंधरस पिऊन केवडा बेहोष होतो. सरता ज्येष्ठ आणि आषाढाच्या ऐनातले ओढाळ पाणी पिऊन सुखावलेल्या पानांच्या मधोमध अपार गंधाची कळी आकारू लागते. पिवळ्याधमक सोनसळी रंगाचे झगमगीत सोनकणीस डोकावू लागते. त्या गर्भ रेशमी दडस पानांच्या सातपदरी पडद्यांमधून फुटणाऱ्या गंधलाटा कणाकणातून लहरू लागतात. केवडा म्हटला की घनदाट गंधाची लहर सुरेखच, पिवळ्या रंगाची टफेटा कापडाच्या