पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्रपणे सुरू झाल्यावर तिला माझा खूप अभिमान वाटे. पैशाची प्रतिष्ठा तिच्या लेखी कधीच नव्हती.
 महिला सदनच्या उभारणीत तिचा उत्साहाचा वाटा. वनिता समाजात ती जात असे . सुरेखपैकी बॅडमिंटन खेळे . आमच्या घरातच खालच्या मजल्यावर तिचे पार्टनर मधुभाऊ जोशी रहात , चाळीसपंचेचाळीस वर्षापूर्वी बॅडमिंटन खेळणे , मिश्र दुहेरी सामन्यात सहभागी होणे , आशीर्वाद सारखी नाटके वसवून त्यात सहभागी होणे, निर्वासितांसाठी कपडे गोळा करणे , सैनिकांसाठी स्वेटर्स विणून पाठवणे या गोष्टी ती सहज करी , यात पपांचाही वाटा होता.
 मला आठवते तशी ती राष्ट्रसेवादल प्रमुख होती. इंटकचे पुढारी असलेल्या श्री. वि. वा. नेने यांचा सहपरिवार मुक्काम आमच्या घरी होता. रेशनिंगचे दिवस होते. पण कधीही आईने कुरकुर केली नाही . मध्यंतरी त्यांनी लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक पाहण्यात आले. त्यात या राहण्याचा कुठे उल्लेख आला नाही. आईपपांच्या सहवासात असंख्य माणसे आली . पहाता पहाता दूर वा व्यावहारिकदृष्ट्या पुढे निघून गेली . आई मात्र नेहमीच आत्मतुष्ट होती. आर्थिक व राजकीय आकांक्षा नव्हत्याच आणि म्हणून खंतही नव्हती.
 सेवादलाचे ऋण मानणाऱ्यांनी मात्र आईवर खूप प्रेम केले, तिला आदर दिला. कलापथकाचे दिवस आले की ती मनोमन खुष असे. बापटकाका, सुधाताई, सदानंद वर्दे, प्रमिलाताई दंडवते, लीलाधर, यदुनाथ नि जान्हवीताई थत्ते, आवाबेन, नाना नि सुधाताई डेंगळे , सारी सेवादलाची मंडळी . ते तिचे श्रीमंत माहेरच होते जणू या मंडळींनाही आमचे घर कधी परके वाटले नाही. डॉ. वसुधा धागमवार , गीताबाई सान्यांची मुलगी, धडगावला काम करण्यासाठी आली . ती आईची भाची वनून गेली. ३२/३३ वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध कथाकार प्रा. कमल देसाई धुळ्याला मराठीच्या प्राध्यापिका म्हणून आल्या प्रधान मास्तरांनी आईचाच पत्ता दिला होता. त्याही आमच्याच बनून गेल्या . अशा त्या प्रचंड संसाराची सहजपणे उठाठेव करणारी माय पाटावरून उठून गेली आहे. गेली चार पाच वर्षे थोडीफार आजारीच असे . पण तिने आजाराचा बाऊ केला नाही. प्रकाशची पत्नी, माधुरी तिची माहेरवाशीणच होती. तिने अत्यंत प्रेमाने आईची सेवा केली. आपल्या सुनेला आपले करावे लागते , तिला माहेरीही निवांतपणे जाता येत नाही याचे तिला वाईट वाटे. तिच्या चिमण्या नाती , जणू तिचा प्राण . छोटी अमृता रोज रात्री तिची गादी घालून देई . आजीची पापी घेऊन तिला गुड नाईट , सी यू वगैरेचा उपचार करी. अभिजितच्या वायकोचेही तिला अप्रूप होते . नातसून आपण पाहिली यातच ती तृप्त होती .
 "शैला येऊन भेटून जाते. पण माहेरवाशीण कितीही वेळा आली तरी पोट भरत नाही." ती म्हणे.



आई : साधीसधी तरीही असामान्य ॥१११॥