पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदल्या दिवशी रात्री खूप गप्पा मारल्या. मी जुनी जुनी गाणी म्हणून दाखवली. बोलताना माझा हात धरुन म्हणाली,
 "का उशीर होतोय कळत नाही."
 "कशाला ग?" माझा प्रश्न.
 "हेच ते मन कशात अडकलंय?"
 "छे गं! मी मजेत आहे. पण आता उशीर नको. माझ्यासाठी प्रार्थना करा. लवकर आटोप म्हणावं." ती म्हणाली.
 "आई , प्रार्थना कशासाठी करायची!" मी ."
 "ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, त्यांसाठी करायची." आई .
 आणि दुसऱ्या दिवशी सूर्याच्या शेवटच्या किरणांचा हात धरून ती निघून गेली.
 थोडी कण्हली म्हणून माधुरीने विचारले, आई , त्रास होतोय का? आता अगदी! जावेसे वाटतेय ... तिचे उत्तर.
 आम्ही पपांना तिच्याजवळ आणून बसवले. तिचा हात पपांनी हातात घेतला. ती मला म्हणाली , त्यांना कशाला इथे बसवलेस? ते हळवे आहेत. त्यांना सोसणार ! नाही.
 आणि हेच शेवटचे. शब्द.
 पपांनी मला विचारले ,हॅजशी पास्ड् अवे? इंग्लिश भाषेचा आधार त्यांनी घेतला. दुसऱ्या दिवशी ते मला सांगत होते. "आधी तिने माझा हात घट्ट धरला . मग माझ्या लक्षात आले की तिचा हात सैल पडलाय आणि गारही."
 आईपपांची पिढी स्वप्नांना मातीचे पाय देण्यासाठी झटली. शब्दांना संदर्भ होते. वचनांना अर्थ होता.
 तीन्ही सांजा सखे, मिळाल्या देई वचन तुला
 आजपासूनी जीवे अधिक तू माझ्या हृदयाला ...
हे वचन त्यांनी उणीपुरी छपन्न वर्षे पाळले . ते वचन मागणारी हाती हात देऊन तिन्ही सांजेचा मुहूर्त साधून निघून गेली. परंतु सभोवतालच्या परिसरात स्वतःला पेरून गेली. आज ती नाही . पण जिथे जिथे राष्ट्रसेवादल विचार आहे, तिथे तिथे ती भरून उरली आहे.

܀܀܀

॥११२॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....