पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी. वाळाने दुपट्यात शी केली . घाण वास आला . नि पाळण्याजवळ गेले. नाक वाकडे करून दूर पळाले पण मन खायला लागले . परत पाळण्यापाशी आले. वाळाच्या अंगावरची दुलई दूर केली नि भपकारा नाकात शिरला. तशीच दुलई अंगावर टाकून मी पार गच्चीत गेले. थोड्या वेळाने येऊन पहाते तो गुरुजींनी वाळाला साफ करून पलंगावर टाकले होते . घाणेरडे कपडे नीट गुंडाळून कोपऱ्यात ठेवलेले आणि वाळ चांगले खेळतेय. मी शरमेने चूर झाले. वर पहाण्याचे धैर्य होईना.
 "वघ, बाळ ताईला बोलवतंय." गुरुजींचे शब्द .तेव्हापासून मला त्याची घाण वाटली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भंगीमुक्ती मोहिमेचा भाग म्हणून राष्ट्रसेवादलाचे सैनिक संडास सफाई करण्यास जात . आईपपांबरोबर मीही गेले आहे.
 मी गावे, नाटकात काम करावे असे आईला वाटे. गाण्यावर तर तिचे खूप प्रेम. मला वयाच्या दहाव्या वर्षी तिने श्रीपादशास्त्रींकडे गाणे शिकायला पाठवले. त्यांनीही भरभरून दिले. पण मीच नादान . त्या वयात संध्याकाळी चार भिंतीच्या आत आऊ करण्यात माझे मन लागत नसे. काही ना काही वहाणे मी करी. माझा आवाज वरा असावा. अप्पा म्हणत , तुझ्या गळ्यात ठुमरी कशी वसवतो बघ , कोंदणात हिरकणी वसवावी तशी . पण कोंदण हाती येईल तर ना? मी संगीत विशारद झाले तरी गाणे आत्मसात केले नाही म्हणून आईला नेहमी खंत वाटे. अगदी शेवटपर्यंत .मी तिच्यासाठी गात राहिले. ती जायच्या आदल्या दिवशीही मी कितीतरी गाणी म्हटली. माझिया माहेरा जा हे गाणे म्हणताना माझा आवाज जड झाला . भरून आला. तिच्या क्षीण हातांनी तिने माझा हात थोपटला. ते थोपटणे खूप काही सांगणारे होते.
 माझ्या मित्रमैत्रिणींची ती मावशी होती. कोणत्याही मुलाला मानलेला भाऊ म्हणण्याची पाळी माझ्यावर आली नाही. गिरीधर , एम.बी., सुरेश , शरद , अरु, अशोक , कितीतरी जण. . मी लग्नानंतर अंबाजोगाईला आले तरी त्यांचे आणि तिचे बंध घट्टच होत गेलेले. आजही आम्ही मित्र म्हणून नितळपणाने गप्पा मारू शकतो . अपार स्नेह आजही ताजा आहे . ही सारी तिने माझ्यावर टाकलेल्या विश्वासाची किमया आहे .
 माझा आंतरजातीय प्रेमविवाह . तिला माझी चिंताच असे. तिचे सारे लक्ष माझ्या घरट्याच्या सुरक्षिततेवर असे . मी लाडाकोडात वाढलेली . कामाची वा जबाबदारीची सवय नाही आणि डॉक्टर लोहिया काहीसे तापट . करारीही. सुरुवातीची काही वर्षे ती धास्तावलेलीच असावी . सामाजिक कार्यकर्त्यांचा संसार करताना किती ठिकाणी गाठी माराव्या लागतात हे ती जाणत होती आणि म्हणूनच मी स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे रहावे असे तिला वाटे. मी एम.ए.होऊन महाविद्यालयात नोकरीला लागले . १९७२ साली नोकरीत कायम झाले आणि १९७४ मध्ये डॉक्टरांनी व्यवसाय सोडला , माझ्या एम.ए.मागची प्रेरणा पूर्णत्वाने तीच आणि पुढे 'मानवलोक'चे काम

॥११०॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....