पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न्याहळत होती. मग खूप विचित्र दुरावा तिच्या नि माझ्यात आला. तो दुरावा माझी जुया मोठी झाली तेव्हा अचानक संपला नि मनाला खंत लागून राहिली की मी अगदी आतून , किंचितशी का होईना आईपासून दुरावले होते. पण तेव्हा पासून मात्र मागचे अंतर जोडून घेण्यासाठी मनोमन धडपडत , तडफडत राहिले.
 आमच्या पपांनी व्यवसाय म्हणून वकिली केलीच नाही. जणू तो फावल्या वेळातला उद्योग. समाजवादी पक्ष , विविध चळवळी, स्थानिक प्रश्ना, राष्ट्र सेवा दल, महिला सदन इत्यादी अनेक व्यापांनी त्या दोघांचे कुटुंबजीवन रसरसलेले होते. मला आठवते तेव्हापासून ती राष्ट्र सेवा दल परिवाराशी पूर्णपणे जोडलेली होती. आमचे घर या सामाजिक पाहुण्यांनी नेहमीच बहरलेले असे आणि आई या सर्वांचे स्वागत उत्साहाने करी. कुणाला काय आवडते हे तिला नेमके माहीत असे. एक निर्लेप साधेपणा आमच्या घराला होता . फणीकरंड्याच्या आरशापुढे ऐसपैस बसून दाढी करणारे मधु दंडवते, नाना. मस्तपैकी खुर्चीवर बसलेले नि चाकवताची ताक घालून केलेली पातळ भाजी नि भात चवीने खाणारे नाथ पै. पत्ते खेळताना, पान लक्षात न ठेवता टाकले म्हणून आईलाही धपाटा घालणारे भाऊ रानडे. संजूच्या लग्नात सेवा दल बहिणींना खादीची साडी आहेरात देण्याचे स्वप्न रंगवणारे डॉ. अंबिके. शकुंतलाबाई तुम्ही स्वयंपाकघरातून थोड्या जास्त बाहेर या असे रोखठोक सांगणाऱ्या नि डॉ. राम मनोहर लोहियांवर अपार प्रेम करणाया, सातपुड्यात हिंडता हिंडता अचानक धुळ्याला येऊन डॉ. अष्टपुत्रेबाईना कडकडून भेटणाऱ्या इंदूताई केळकर. अनुताई लिमये तर आमच्या मावशीच वाटत, आईसारख्याच निग्रही पण अतीव कोमल हृदयाच्या . त्याही अधूनमधून येत. सिंधूताई मसूरकर, आताची डॉ. सिंधू पार्थ चौधरी. तिच्या लग्नाचा काळ मला स्पष्ट आठवतो . कुसुमताई लेले, सिंधुताई, रेशमाताई ,या सगळ्या जणींना आई जणू मैत्रीण वाटे. आंतरजातीय वा प्रेमविवाह करणाऱ्यांना आईने नेहमीच दिलासा दिला. सुमनताई भालडे, कमलताई दलाल, श्यामलताई पाटील या माझ्या आईच्या माहेरवाशिणीच. आणि हा स्रोत कालपरवापर्यंत अव्याहत सुरू होता. आपल्या या लेकींचे कौतुक ती मनापासून करी. दशरथतात्या पाटील नि कमलताई जणू आमच्या घरातच उगवलेले . तात्या वा कमलताई आठ दिवस आले नाहीत तर तिला करमत नसे.
 शिवदासभाऊ चौधरी माझी पहिली पाठवणी करायला अंबाजोगाईला आला होता. फुले आणताना आईचे पाय फक्त तापीराम माळीच्या दुकानाकडे वळत , तर जगूभाऊ आजळकर , शिवराम बगदे, रामभाऊ मोरे हे समाजवादी पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते. कोणी कामगार तर कोणी कारागीर . पण यांचीही आईकडे फेरी असे . असे हे माझ्या आईचे विशाल कुटुंब.



आई : साधीसुधी तरीही असामान्य ॥१०५॥