पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आई : साधीसुधी तरीही असामान्य



 आज ती या जगात नाही. पण तरीही ती मनभरून , घरभरून उरली आहे. परवा पपांना धुळ्याला नेऊन पोचवले तेव्हा पायरीवर अडखळले. मनात आले, आई नसलेल्या घरात जाण्याची ही पहिलीच वेळ . ती नसलेल्या घरात वावरण्याची सवय करायला हवी. हे मनात येईस्तो मी घरात प्रवेश केला होता नि लक्षात आले, घर आजही प्रसन्न आहे .सुस्नात आहे. तिच्या असंख्य आठवणी भोवताली भिरभिरताहेत. पूर्वी बांगडी फुटली असे म्हणत नसत किंवा दिवा विझला म्हणत नसत. तर बांगडी वाढवली, दिवा वाढवला असेच म्हणत. तशीच आई वाढवली आहे.
 गरुडबागेतले ते घमघमते बकुळीचे झाड चक्क वठले आहे. परवा गरुड बागेत जायचे झाले आणि पहाते तर काय आतून खंक वाळलेले, खंडलेले खोड उभे. फांद्याचा भार एवढा जड झाला की तो उतरावा लागला. पण माझ्या मनातले फुलांनी रिमझिमणारे बकुळीचे झाड मात्र ताजेपणाने उभे आहे . पायतळी किनारदार फुलांचा सडा गच्च सांडला आहे . झग्यांचे ...पदरांचे ओटे भरभरून गेले तरी ती फुले संपणार नाहीत नि झाडही अक्षयपणे घमघमत राहणार आहे. आमच्या घरातले ते बकुळीचे झाड नजरेआड गेले तरी अनेकांच्या मनात गंध पेरीत रहाणारच आहे.
 शब्द वापरीत रहाणे ही आपली अंगभूत सवयच. आई आणि तिचे मूल यांचे जोडलेपण किती तऱ्हांनी व्यक्त करतो आपण ! पण या शब्दांच्या अंतरातले गाभे लक्षात यायला, स्वतःला खर्ची घालावे लागते. आईच्या शेवटच्या आजारपणाचे निदान कळल्यानंतरची गोष्ट.
 "तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" ग्रेसच्या कवितेतील या ओळींनी काळीज अक्षरशः तळमळून गेले.
 आज तिच्या आठवणी आठवायला निघाले तर एकही आठवण सलगपणे येत नाही. पण एकात एक मिसळलेल्या लक्षावधी क्षणांची-स्मृतींची गर्दी होते. किती रंग...किती रूपे! खसाखसा केस चोळून मला न्हाऊ घालणारी आई . डोळ्यात जाणारे शिकेकाईचे पाणी. डोळे चुरचुरल्यामुळे मिटलेले . नागरमोथ्याचा उष्ण गंध . मी डोळे किलकिले करून पाहिले तर आई तिच्या टप्पोऱ्या डोळ्यांनी मला अंगभर

॥१०४॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....