पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वळ कुरवाळीत उन्मनी होऊन तो बडबडला ,

घनु वाजे घुणघणा वारा वाहे रुणझुणा
भवतारकुहा कान्हा वेगी भेटवा का ...

 चांदण्याच्या शीतल चंदनरसात नहाताना उरातून जळणारी , जुईफुलांच्या कोमल शेजेवर तळमळणारी ती, मीच होते ना ?
 तुझ्या श्वासांची, पावलांची चाहूल लागताच कशीबशी उठून , केस सारखे करण्यासाठी दर्पणासमोर उभी राहिले मी .. तर काय? मी होते कुठे?
 दर्पणभर पसरला होतास तू. तू आणि तू ...
 आणि तुझ्यात विरून जाण्यातली तृप्ती निहारताना , अनुभवताना , माझ्यातली मी केव्हाच मुक्त झाले होते. सुसाट धावत सुटले होते, विरहाच्या कोवळ्या कळा कवटाळण्यासाठी!
 विरहवेदनेचे विखारी अमृत मी प्याले उर्मिलेच्या थरथरत्या हातांनी. ते पिताना ठसका लागला तेव्हा पाठीवरून हात फिरले वनवासी सीतामाईचे. सुरकतलेले शुष्क हात . भोवंडून उडू पहाणाऱ्या जीवाला घट्ट सावरून धरले मीरेच्या एकतारीने. पुराचे पाणी वाहून जावे तशी वाहून जाणारी वर्षे. पण मी मात्र तशीच. एकाकी . नुस्ती वाट पहाणारी.
 प्रत्येक श्रावणझडींना आठवत असेल एखादी उंच गढी. त्या गढीच्या टोकावरचा ऐन महाल .आणि त्यातली मीलनोत्सुका मी. महालातले खसाचे पडदे उतरून ठेवणाऱ्या सखीला मीच तर म्हणाले होते,
 "बाई गं, या तलखीनं जीव उडून चाललाय माझा. खसाच्या पडद्यावर चिंब पाणी शिंपडायचे सोडून हा उलटा उद्योग कुणी सांगितला तुला?"
 सखीने हातांचा आधार देऊन सौधावर आणलेन मला . आणि दाखवले दूरदूरवरचे फडकते निशाण . तिथल्या कनातीत मुहूर्ताची वाट पहाणारा तू नि तुझे शिलेदार . अजून आठवतेय ती सावनी सांज.
 कलत्या उन्हाच्या रेशमी बटा हिरव्या झाडापानांवर झुळझुळताहेत . तृप्त मातीच्या कुशीत पहुडलेली हिरवी बाळं टुळूटूळू नजरेनं आभाळ न्याहाळताहेत . पहाता पहाता आभाळाचं गर्द निळं भिंग बनून गेलय . त्या आरस्पानी भिंगातून निळ्याजांभळ्या केशरी लाटा कल्लोळत पुढे पुढे धावताहेत . त्या लाटांत बुडून जात आहेत झाडं, पानं , डोंगर आणि मीही.
 तिन्हीसांजेच्या अर्धुक्या उजेडात सखी माझ्या हातापायांवर मेंदीची नक्षी रेखतेय. उरातली वाढती तलखी ... आणि चढत जाणारी रात्र , चढत जाणारी मेंदी! पहाटे पहाटे तुझा पंचकल्याणी घोडा विजयाचे तोरण माथ्यावर बांधून अंगणात येतो. समईतल्या वाती विसावून शान्तावतात. तुझ्या असोशी घनगर्द मिठीत विरघळून

॥१०२॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....