पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी युग विरहिणी



 मी आदि, मी अनादि, भी अनंत, मी युगविरहिणी.
 प्रत्येक श्रावणात पाऊसधारात सचैल...चिंब भिजणारी, आणि आकंठ निथळताना प्राणातून जळणारी. आजही श्रावणगंध दहा दिशांतून घमघमतो आहे. आषाढ पर्जन्याचा असोशी धसमुसळेपणा मातीच्या अंगांगांतून रुजलाय.
 नको नको म्हणत सोसलेल्या त्या कळा आज , लेणं बनून अंगांगावर झिळमिळताहेत. गोरंगोमटं तान्हुलं कुशीत असावं . बाळाच्या रूपाकडे पहात सुखावताना, त्याच्या दुराव्याची नाजूक कळ सरसरून जावी , सुखाचेही शहारे उमटून जावेत , तशी धरणी.
 धरणी, ऐन श्रावणात ग्रीष्माच्या अंगारकी आठवणीत हरवून जाणारी... निष्पर्ण एकाकी रात्रींना , श्रावणस्वप्नांचा मिणमिणता दिवा पदराआड झाकून निरोप देणारी.
 धरणी, युगविरहिणी.
 शेकडो वादळं वाहून गेली . लाखो श्रावण बरसून गेले. पण माझ्या मोकळ्या केसांच्या बटा अजूनही सैरभैर उडताहेत . आशांचे दिवे होऊन तेवणाऱ्या डोळ्यातले काजळ गालांवर ओघळून सुकले आहे . हातापायांच्या फुलवातीतून गळून पडलेली काकणं चूर झाली आहेत. पैजणांचे घुंगरू मुके झाले आहेत. माझ्या हातातली ही वीणा , कधी या यक्षपत्नीच्या कृश बोटांनी तर कधी वासवदत्तेच्या स्पर्धांनी विरहाचे गर्भरेशमी गीत गुणगुणणारी , आजही तेच, अगदी तेच , आर्त तरीही उत्सुक सूर छेडतेय.
 आकुळ व्यागुळ रैण बिहावा, बिरह कलेजो खाय
 दिवस ना भूख न निदरा रैणा , मुख सूँ कह्या न जाय
 कोण सुणे ? कासुँ कहियारी, मिल पिव तपन बुझाय
 प्यारे दरसण दीजो आज , थे बिण रह्या ण जाय.
 तुझ्या मीलनासाठी माझ्या प्राणांनी मांडलेला आकान्त , तुझ्या घनगर्द मिठीत मिटून शून्य होण्यासाठी माझ्या रक्ताने घेतलेला ध्यास ,त्या सोळा वर्षांच्या ब्रह्मचाऱ्याला कळला. माझ्या डोळ्यातले पूर , त्याचे अंगण भिजवून गेले . माझ्या सनातन वेदनांचे



मी युग विरहिणी ॥१०१॥