पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हात जोडून , नवी नवलाई फांद्याफांद्यातून फुटायला लागते. जणू त्यांना या इवल्याशा जीवनातील अपूर्व आनंदोल्हासाचा सत्कार करायचा असतो , मृत्यूतून फुलणाऱ्या वसंताची साक्ष द्यायची असते.
 बसंताच्या जादुई स्पर्शाने अंगणातल्या जुईमोगरीही लाजून चूर होतात . मोगरीचे किती म्हणून प्रकार . वेली-मोगरीवरचे लांबट टपोरे मदन बाणकळे रात्रीच्या वेळी निरखावेत . जणू सुगंधी आकाशगंगेचा प्रवाह भूमीवर उतरून आला आहे ! मोगरीच्या झुडुपांवर कबुतरी कळ्यांचे टप्पोर पानापनांतून डोकावतात . राजहंसी रंगाच्या या फुलांचे प्राण त्यांच्या मधुर गंधात साठलेले आहेत. एखादीच कळी केसात अडकवा किंवा पाण्याच्या माठात टाका. अवघा आसमंत गंधाने झुलू लागतो.
 तर, असा हा वसंत! कोकिळेच्या स्वरांतून झेपावणारा, गुलाबी वाऱ्यातून अंगांगाला सुखावणारा, फुलापानांच्या रंगगंधातून मातीला खुणावणारा, तरुणाईच्या हृदयातील स्पंदनाना चैतन्य देणारा. घरदार...स्थळकाळ ...नातीगोती यांच्या पल्याड जाऊन आयुष्यात एकदातरी याचं स्वागत गच्च मिठी मारून करावं. मग येत्याजात्या वाऱ्यासोबत वयाचे हिशेब वाढत गेले, डोक्यावर सोनेरी कृतान्तकटकामलध्वजा फडकू लागल्या तरी, नजरेत , हृदयात साठवलेले बसंतीगाणे उतत नाही की मातत नाही, भेटला बसन्त टाकत नाही !

܀܀܀

॥ १०० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....