पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पसारा असो , त्यातल्या त्यात वेळ काढून लिंबाच्या कात्रेदार पानांच्या आणि इवल्याशा फुलांच्या डिक्षांच्या माळांची झिळमळती तोरणं दारादारांवर माळली जातातच . निंबोणीची कवळी पानं, गूळ घालून तयार केलेला घोळाणा घरातल्या दादाजींनी हातावर ठेवल्यावर, तोंड वाकडं न करता खायचा. हो, कारण त्याशिवाय पुरणपोळी ताटात नाही पडायची!
 कॉलेजमागच्या तळ्याच्या काठचं ते एकाकी झाड नेहमीच उदास वाटायचं. उंच वांधा . मातकट हिरवी पानं. डोळ्यात भरण्यासारखे काही नाही. परवा सहज नजर वळली . त्या झाडावर जर्दकेशरी रंगाचे पोपट जणू दाटीवाटीने बसले होते. नकळत पावलं तिकडे वळली . त्या केशरियाला अगदी जवळून निरखण्याचा मोह आवरला नाही. फांद्याफांद्यांवर वाकदार केशरीफुलांचे नखरेल झुबके पसरलेले. त्या झाडाजवळ जाऊन पाय उंचावून... उड्या मारून एक झुवका घरी आणला. त्या झाडाचं नाव मनोमनी केशरिया ठेवलं. घरी हा येताच माझा नवा शोध-दाखवला. तो खो खो खिजवीत म्हणाला , अगं हा पळस . डोंगरात , जाशील तिथे ही झाडं आहेत. या फुलांच्या रंगानं होळी खेळतात, संस्कृत साहित्यातला पलाश होता तर तो! एकच एक दुपदरी बाकदार कळी. त्यातून झिळमिळणाऱ्या रेशमी पाकळ्या . दरवर्षी बसंत येतो. डोंगरातली झाडं केशरिया वनून भरदिवसा झगमगायला लागतात. वाटतं, सूर्याचा ताप सहन न झाल्याने सावलीसाठी वणवण फिरणाऱ्या सूर्यकन्या धरतीवर तर आल्या नाहीत ना!
 ऐन फेब्रुवारीत वसंत पंचमीच्या आधीच आंब्याचे डेरेदार वृक्ष मधुमंजिऱ्यांचे गजरे माळून नटलं . रेखीव नाकाच्या आणि पाणीदार डोळ्यांच्या सावळ्या कोळिणीच्या भरदार अंबाड्यावर सुरंगीचा भरगच्च गजरा माळावा तशी ही सावळी घेरदार झाडं. मोहरल्यावर देखणी दिसणार . हे देखणं रूप नजरेत ठरेस्तोवर बालकैऱ्यांचे झुमके पानांच्या आडून डुलायला लागतात.जशी जशी कैरी टपोरायला लागते तशी तकतकीत होते नि जिभेला सुटतं पाणी. त्यातून ते झाड असतं शेजीबाईच्या अंगणात. दुपारी आई लवंडली की अंगणात जमायचं नि कैऱ्यांवर नेम धरायचे. एखादी टपकन पडली की काळजात धस्स् ! त्या कैऱ्या दगडाने फोडायच्या. हलक्या पावलांनी आणलेले तिखटमीठाचे पुडे. आणि पाठच्या दारी वळचणीला वसून ओरपलेली ही आंबट मिठाई ! आज ते दिवस आठवले तरी तोंडाला पाणी येतं.
 उन्हाळ्यात आंब्याची सायसावली किती शीतल असते. महाबळेश्वरचा थंडाई तुकडा जणू काढून इथे आणलाय ! कैऱ्या, चैत्रगौर , कैरीचं पन्हं , कैरीची डाळ, कैरीची मसाला फोड... या नुसत्या आठवणींनीही कलिजा खल्लास!
 वसन्ताची चाहूल रानातल्या झाडाझुडपांना लागते आणि शिशिरस्पर्शाने गारठलेल्या काटक्यांमधून अमृताचे जीवट रस सळसळायला लागतात . हिरव्या पानड्यांचे कोवळे



हा बसंत रंग भरित... ॥९९॥