पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नजर जावी तिथे सुनासुनाट , ओकीबोकी धरती . निंबोणीच्या जाळीतून डोकावणारा चांदोबा , उजाड फांद्यांच्या आडून दीनवाणा वाटायचा.
 माझ्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर तीन चार शिरीष वृक्ष आहेत. विरळ पानांचे रेशमी जावळ आणि पिवळ्यधमक रंगाचे खुळखुळेच जणू , अशा रुंद फताड्या शेंगा वागवीत ही झाडं मुकाट उभी असतात . जातायेता माझी नजर या झाडांकडे आपोआप वळत असे , माझे श्वास अधीरतेने शोध घेत. निराश होऊन पाय रस्त्यावरून पुढे सरकत . होळी पुनव होऊन गेली होती. गच्चीवर बिछाने पडायला लागले होते. आणि उत्तररात्री अचानक जाग आली. एका विलक्षण गंधाची अत्तरी लाट, श्वासाश्वासातून अंगभर पसरत होती. दूरदूरवरून, वाऱ्याच्या पंखावरून येणारा विलक्षण मधुर गंध. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत रहातात...थेंबाच्या कारंज्यात भिजवत रहातात तशाच या सुगंधी लाटा. तनामनाला गच्च वेढून टाकणाऱ्या.
 आणि माझ्या शरीरातून वीज लकाकून गेली . गेले कित्येक दिवस ज्याची मनोमन , क्षणोक्षणी वाट पहात होते , तो वसंत आला होता.
 या रंगराजाच्या आगमनाची पहिली चाहूल लागते ती शिरीषालाच! एरव्ही डोळ्यात भरायचा नाही हा वृक्ष, शेवटच्या बाकावर बसणाऱ्या अबोल पोराप्रमाणे हे झाड वर्षभर एकटेएकटे असते. वाऱ्याने गदगदा हिंदकळले तरी चारदोन पाने झडायची. लांबरुंद शेंगाचे खुळखुळे तेवढे वाजायचे. दुपारच्या चढत्या उन्हात या खुळखुळ्यांचा आवाज उरात उदासी निर्माण करतो. इतकीच काय ती याची चाहूल. आता मात्र ही झाडं फिक्कट हिरव्यापोपटी लाड्यागोंड्यांनी रसरसली आहेत. शिरीषाचं फूल तर अतीव कोमल . फुंकरीनेही मलूल होईल असं . लांबलांब चवरपाकळ्यांचे किंवा केसरांचे झुबके डोळ्यावरून अलगद फिरवावेत अन् स्वप्नांच्या महालाचे चंदेरी मिनार नजरेत रेखावेत. फांद्याफांद्यावर जणू सुगंधी स्वप्नांचे बहार, ऋतुराज बसंताच्या स्वागतासाठी आले आहेत.
 शिरीषाचे रंग दोन. अगदी फिक्कट हिरव्या रंगाचे शिरीषफूल उमलत्या पहाटेसारखे सौम्य आणि मुग्ध . तर हलक्या बसंती रंगाचे फूल क्षितिजावर रेंगाळणाऱ्या संध्येसारखे मोहक आणि रंगकिमयेने नजर मोहवणारे . मात्र या वसंती ...शरावी रंगाच्या फुलात सुगंधाची कुपी ठेवायला विधाता विसरला असावा. शिरीषाच्या रंगरूपापेक्षाही त्याच्या गंधाची उधळण अधिक प्यारी, श्वासांना भुलवणारी. या फुलांना स्वप्नांचा गंध आहे . श्वासांतून तरळत रहाणारा गंध . पापणीचे तीर भारावून टाकणारा. शिरीषाचे कौतुक करावं तर लगेच गुलमोहर पलीकडून खुणावू लागतो.
 थंडीने नाकाचा शेंडा लाल व्हावा तशी एखादी लालम परी हिरव्या पानपंख्यातून डोकावते तेव्हा मार्चची चाहूल येत असते. पहाता पहाता लालमपऱ्यांची जर्द विमाने हिरव्या पानांवर दाटीवाटीने उतरू लागतात . पहात पहाता सारा वृक्ष लालपिवळ्या



हा वसंत रंग भरित... ॥९७॥