पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा बसंत रंग भरित ...



 एक नुकतीच उमलू पहाणारी ताजीतवानी पहाट. अंधाराचे मावळते ठसे घरादारांच्या , कोवळ्या चैत्रपालवीच्या पापण्यांवर रेंगाळत आहेत . घरट्यांना अजून जाग यायची आहे. कळीचे सुगंधी टप्पोर अजून फुटायचेत. चार भिंतीच्या आड , पुस्तकांवरून निर्जीवपणे फिरणारी माझी नजर थकून , मरगळून गेलीय. जागल्याच्या घुंगुरकाठीचा लयदार ठेका जवळजवळ येत जातो. त्या ठेक्याच्या नादावर उमटलेली एक सहज सुरावट, मावळत्या अंधाराला कोरून जाते. अशा वेळी पुस्तकाचे जाड गठ्ठे आपोआप मिटले जातात . जाळीदार गवाक्षाबाहेर बहरणाऱ्या बसंती पहाटेच्या गुलबासी पाऊलखुणा निरखताना , डोळ्यापुढची ठोकळेवाज , डोके उठाड लिपी दूरदूर विरघळून जाते.
 घड्याळाचा काटा आत्ताशी चाराच्या पुढे रेंगाळतोय. पण रुख्याफिक्या कोनफळी रंगाची छटा चौफेर शिंपली आहे. नव्या दिवसाच्या उजेडाची हलकी चाहूल झाडांच्या, छपरांच्या पेंगुळल्या डोळ्यांना जाग आणते आहे. कालची सारी रात्र उकाड्याने घामेजून गेली होती. वडापिंपळाची वाभरी पानं सुद्धा रात्रभर चिडीचिप्प होती. पहाटेचं सोनेरी पाखरू शिरीषाच्या फांदीवर कधी येऊन बसलं ते रात्रीलाही उमगलं नाही. पण उकाड्यानं पेंगलेल्या देहावरून सुगंधी लहर भिरभिरून गेली नि त्या स्पर्शानं रात्रीचा अवघा देह मोहरुन झुलला. तिनं कौतुकानं शिरीषाकडे नजर टाकली . शिरीषाचा माथा सुगंधी रेशीमचौऱ्यांनी झिळमिळला होता.
 यावर्षी पाऊस नको तितका रेंगाळला . थंडीनेही साईसुट्यो उशिरानेच दिली. अगदी कालपरवापर्यंत थंडीचे कडक कडाके सारा आसमंत गोठवून टाकीत होते. झाडाझुडुपांवर वार्धक्याचे ठसे उमटवून शिशिर केव्हाच दूर गेला होता.
 एरवी, या दिवसात , पिंपळ हिरव्यापोपटी लक्ष लक्ष मोरपिसांनी झुळझुळत असायचा. पण शिशिराचे थरथरते हात पिंपळाच्या फांद्याफांद्यातून फिरले नि सारा वृक्ष रिकामा झाला. वावटळी यायच्या, पिकल्या पानांची विमानं पळवत निघून जायच्या . विस्कटलेल्या वैभवाची विकल साक्ष देणारं ते प्रचंड रिकामं झाड ! मनात रुतायचं. एक टवका खवळून दुखवायचं. सोनेरी सुगी संपलेली. खळीदळी झालेली.

॥ ९६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....