पान:वामनपंडित.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६१ वामनपडित. आड येण्याचे कारण नाही. समर्थांचे मुख्य दैवत जरी राम होते, तरी 'दासबोध,' 'मनाचे श्लोक' वगैरे प्रकरणांत त्यांनी गणपतिसरस्वतीला नमन केले आहे. 'सुखकर्ता, दुःखहर्ता' ही प्रसिद्ध आरतीही समर्थांचीच आहे. वरील प्रकरणांपैकी काहींतील भाषा साधारण सरळ व भारदस्तही आहे, परंतु काहींची अगदीं गचाळ, अशुद्ध व पोरकट आहे. पण समर्थशिष्य वामनाविषयी जी दंतकथा आहे, तीवरून असेंच असणे स्वाभाविक दिसते. हा कवी संस्कृताचा अभिमानी असून, प्राकृत भाषा वापरणे हे तो प्रथम पापच समजत असे. परंतु पुढे समर्थांनी त्याचा गर्व परिहार करून, त्यास प्राकृत रचना करण्यास लाविले, अशी दंतकथा आहे. तेव्हां 'मनास बोध,' 'करुणाष्टक,' 'विराटपर्व' वगैरे प्रथम घेतलेली प्रकरणे, मराठीचा चांगलासा सराव नसल्यामुळे, रचनेसंबंधे बरीचशी कमी दर्जाची निपजली. परंतु पुढे मराठी रचनेचा व्यासंग जसजसा वाढत चालला, तसतसे तिच्या ठिकाणी प्रयोगशुद्धत्व, सरसत्व व प्रौढपणा ही येऊ लागली, असे दिसते. (३) गंगारप्रिय वामन.-कात्यायनी व्रत (प्रथम), रासक्रीडा, राधाभुजंग, राधाविलास, गोपीगीत, जलक्रीडा वगैरे काव्ये या कवीची असावीत. यांतील रचना फारच गोड, कोमल व मनाला भुलविणारी आहे. यमकानुप्रास ओतप्रोत खचले असून, छंदही उद्दिष्ट रसाला पूर्णपणे अनुकूल असेच निवडले आहेत. रचनेत तरतरीव मृदुता, चमत्कारिकत्व व सरळता, प्रौढता व विनोद यांचे फारच चटकदार मिश्रण झालेले आहे. पण या काव्यांतील मुख्य गोम ही आहे की, भक्तिरसाच्या ऐवजी शृंगाराचा लोंढा यांत फार जबरदस्त झाला आहे. शृंगाररसाचा भयंकर महापूर उद्दामपणाने वाहून गेल्यामुळे, बऱ्याच ठिकाणी अश्लील बीभत्सपणाच्या कर्दमांत वाचकांचे मन अटकून राहते व मग 'प्रवत्तीत निवृत्ति दाखविण्याची' कितीही जादू व कवाईत कवीने केली, तरी ती स्थिति लवमात्रही सुधारत नाही. कामदृष्टीने व विषयलोलुपतेने माझी काव्ये वाचूं नयेत व मी ती त्या हेतूने लिहिलींही नाहीत, असें कवीने ठिकठिकाणी बजाविले आहे.