पान:वाटचाल (Vatchal).pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांजवे मास्तर : ९९

नव्हते. सन १९३८ साली मोंढा मैदानावर ते पहिले सत्याग्रही होते. दोन वर्षे सक्तमजुरी व २००० रु. दंड अशी शिक्षा त्यांना देण्यात आली. पण तिची फिकीर, शिक्षेची चिताच कोणाला होती ! दंड भरावयाचाच नव्हता, मग २००० काय व दोन लाख काय दोन्हीही सारखेच होते. आव्हान जाणीवपूर्वक व प्राणपणाने दिलेले होते. मग दोन वर्षे काय आणि जन्मठेप काय दोन्हींतही काही फरकच जाणवत नव्हता. त्यांचे सहकारी सांगतात, सत्याग्रह करताना ते आवेशाने बेभान दिसत नव्हते. शिक्षा ऐकताना त्या प्रसंगीही त्यांचा चेहरा तसाच निर्विकार होता. शिकवण्या घेण्याकरिता जाताना ते जसे डौलात जात त्याच संथपणे गावातून बेड्या घातल्या तरी तसेच चालत असत.
 बहादूर-यार-जंगच्या प्रक्षुब्ध सभास्थानी वृत्तांत मिळविण्यासाठी जाणे असो की जिल्ह्याचा प्रचार दौरा असो, शामराव बोधनकरांच्या पेढीवर ते असोत की सभेत असोत, मागची चिंता त्यांनी कधीच केली नाही. जणू मनाने ते एकटे होते व एकटे राहण्याची त्यांची तयारी होती. जणू अनिकेत असणे त्यांना नवीन नव्हते, व पुन्हा अनिकेत असण्याची त्यांची तयारी होती. ममत्वाचा एकच अंकुर त्यांच्या जीवनात उगवला होता. तोही फार उशिराने उगवला. या अंकुराने त्यांना मनस्तापच दिला आणि तो कोळपून गेला. पण ती उद्विग्नता विसरण्याचे मास्तरांजवळ एकच साधन होते. त्यांनी अपत्यविरहाचे दुःख नाटयसंमेलनात जिद्दीने भाग घेऊन पचविले. हे एक अग्निदिव्यच होते. त्यातून बाहेर पडणे हे सोपे नव्हते. जीवनात कणखरपणे वागण्याचे प्रसंग थोडे नव्हते. झेंडा प्रकरण असेच कसोटी पाहणारे होते. वातावरण दोन्ही बाजूंनी तापलेले होते. १९४६ सालचा हा प्रसंग. काँग्रेस ऑफिसवर राष्ट्रध्वज डौलात फडकत होता. त्या ध्वजाखालूनच रजाकारांची उन्मत्त सशस्त्र मिरवणूक जाणार होती. म्हणजे किती कठीण प्रसंग !
 माजलेल्या सत्तांधांना हे सहन होणेच शक्य नव्हते. त्यांनी ध्वज खाली घेण्याची मागणी केली. समोर हजारो क्षुब्ध सशस्त्र जातीयवादी. ते म्हणाले, ध्वज उतरवा, नाही तर कुत्र्याच्या मौतीने मरावे लागेल. गांजवे निशस्त्र असूनही निर्भय होते. शांत, कणखर आवाजात ते म्हणाले, " ते शक्य नाही. ह्या आमच्या राष्ट्रध्वजाच्या प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावणे आमचे कर्तव्यच आहे." ओरड खूप झाली. रक्तपाताची वेळ आली. पण शेवटी ध्वज तसाच डौलाने फडकत राहिला. असेच कसौटीचे प्रसंग, भूमिगत सशस्त्र लढयाचे नेते म्हणून काम करताना व उमरखेड कॅम्प सांभाळताना आले. मास्तरांच्या निष्ठा गांधीवादी नव्हत्या याचा वर उल्लेख आलेलाच आहे. त्यांच्या निष्ठा शस्त्रबळाला वाहिलेल्या होत्या काय ? तसेही नाही. या निष्ठा अमूक एका मार्गाला वाहिलेल्या नव्हत्या, तर ध्येयवादाला वाहिलेल्या होत्या. जेव्हा सत्याग्रह ठरले ते त्यांनी चोखपणे पार पाडले. जेव्हा