पान:वाटचाल (Vatchal).pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१०० : वाटचाल

चळवळीत शस्त्र वापरावयाचे ठरले तिथेही ते तेवढ्याच चोखपणे वागले.
 सशस्त्र चळवळीचा फार मोठा धोका यश हा असतो. यशानंतरच्या उन्मादात स्वातंत्र्यसैनिक अधःपतित होतात. खाजगी वैरे साधली जातात. त्यांच्या आर्थिक स्थितीत एकदम फार मोठा बदल होतो. सामाजिक दर्जात बदल होतो. मास्तर या मोहातून स्वच्छ हाताने बाहेर पडले. हे मी त्यांचे फार मोठे यश मानतो. त्या काळातील कार्यकर्त्यांचे काय झाले याविषयी चर्चा किंवा वाद आहेत. त्यांच्या अधःपतनाच्या खऱ्या-खोटया आख्यायिका आहेत. गांजवे मास्तरांविषयी अशी वदंतासुद्धा नाही, हे मी मोकळ्या मनाने नमूद करू इच्छितो.
 प्रतिभा निकेतन, कलामंदिर, गोदातीर, इतिहास संशोधन मंदिर, या संस्थांशी त्यांचे दीर्घ संबंध आहेत. नांदेड एज्युकेशन सोसायटीचे तर ते आरंभापासून कार्यवाह आहेत. पण मास्तरांनी कोणावर आकस धरून सूड घेतला असे कुणी म्हणणार नाही. ज्यांच्या विरोधी निर्णय मास्तरांना घ्यावे लागले तेही असे म्हणत नाहीत.
 महिला शिक्षण समितीपासून नांदेड येथे झालेल्या सर्व सभा, संमेलनांपर्यंत, अगदी परवाच्या नाटयसंमेलनापयंत, गांजवे मास्तरांनी कुठल्या ना कुठल्या प्रकारची झीज सोसली नाही असे कधी झाले नाही. या सगळ्याच ठिकाणी ते काही पदाधिकारी नसत. पुष्कळदा छोटी छोटी तरुण मंडळी पदाधिकारी असत. पण म्हणून गांजवेमास्तरांची यातायात कमी होत नसे. आणि यात गंमत अशी की, सगळ्या कामाची त्यांना मनातून हौस असते. नुसत्या राजकारणाने त्यांचे मन भारलेले नाही. उलट सत्तेच्या राजकारणाला ते फार लवकर विटले. त्यांना संगीत ऐकणे आवडते. ते स्वतः अभिजात संगीताचे कार्यक्रम व्हावेत म्हणून कष्ट घेतात. प्रसंगी खस्ता खातात. काव्यगायनाचे त्यांना वावडे नाही आणि व्याख्याने व चर्चा यांचे तर वेडच आहे. एकूण त्यांना सगळ्या प्रकारची ज्ञानकेंद्रे आवडतात.
 गांजवे मास्तरांचा सगळा परिचय लिहावयाचा व एक महत्त्वाची गोष्ट लिहावयाची नाही हे काही बरे दिसणार नाही. त्यांचे काही कठोर आग्रह असतात. निझामी राजवट संपली पाहिजे हा एक असाच आग्रह होता. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, हाही त्यांचा असाच आग्रह होता. खातापिताना, नेहमी जनीजनार्दनी बोलताना जे रोज महाराष्ट्र, महाराष्ट्र जपत होते त्यांच्यापेक्षा या प्रश्नी मास्तरांच्या श्रद्धा कठोर होत्या. या कठोर श्रद्धांमुळे ते प्रत्यक्ष राजकारणातून मागे फेकले गेले. हा त्यांचा त्याग असाच मोठा होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा एकीकडे तापत होता आणि मास्तर अस्वस्थ झाले होते. माझ्यासारखी माणसे तर हिंस्र भाषेतच बोलत होती. शेवटच्या क्षणी हैद्राबाद विधानसभेत 'बिल' आले. त्यात हैद्राबादचा मराठी भाषक भाग द्वैभाषिक मुंबई राज्याला जोडावा असा उल्लेख