पान:वाटचाल (Vatchal).pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९८ : वाटचाल

सेनापती, पण प्रत्येकाची तऱ्हाच निराळी. प्रत्येक आघाडीवर मला लढलेच पाहिजे म्हणणारे शामरावजी आणि म्हणाल त्या आघाडीवर सांगाल तेव्हा जातो म्हणणारे गांजवे. देवांची पद्धत कुठे लढावयाचे व केव्हा लढावयाचे याचा निर्णय स्वतः घेण्याची असे.
 आर्य समाजाचे काही संस्कार मास्तरांच्या मनावर झाले असावेत, असा माझा समज आहे. आरंभापासूनच त्यांचे विचार सुधारकी वळणाचे होते. कण्व परिषदेचे ते सभासद असत. अजूनही असतील. पण अशा कार्यात त्यांना रस येत नाही. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यात त्यांना फार रस आहे. नांदेड येथे पहिला पुनर्विवाह त्यांनी लावला आणि यानंतर किती धर्मकन्यकांचा भार साहिला व निस्तरावा लागला हे तेच स्वतः सांगू शकतील.
 अशा प्रकारची तीन-चार उदाहरणे तर माझ्यासमोर आहेत. एका उदाहरणात तर आई, तिची मुलगी व मुलीची मुलगी यांच्या जबाबदाऱ्या निस्तरताना काय यातना झाल्या या इतिहासाचा काही भाग माझ्या नजरेसमोरचा आहे. प्रा. सौ. ताराबाई परांजपे यांनी त्यांना अगणित धर्मकन्यकांचा पिता, वत्सल पिता, असे म्हटले आहे. ते बरोबरच आहे. यातून धमक्या देणे, कोर्टात जाणे, पोलिसांचा ससेमिरा, आर्थिक झीज असे सगळे प्रकार झाले. कै. महाजनावरील धर्मसभेच्या बहिष्कारनिर्णयाला आव्हान देण्यास गांजवे मास्तर होतेच. अशा या वातावरणात कुठेतरी त्यांचे मन पेटून उठले असावे आणि ते राजकारणाकडे खेचले गेले असावे.
 स्टेट काँग्रेसची स्थापना १९३८ ला झालेली. पण त्याहीपूर्वी गांजवे मास्तर राजकारणात होते. १९३५ साली परतूडला महाराष्ट्र परिषदेची पहिली बैठक झाली. या बैठकीपासूनच पू. स्वामीजींनी सूत्रे हाती घेतली. या बैठकवजा अधिवेशनाला गांजवे हजर होतेच. तेव्हा त्यांच्या मनाचा कल त्याहीपूर्वी राजकारणाकडे वळला असावा. श्री. गांजवे यांना कोणती दृष्टी मोह धालीत होती? ते हिंदुत्ववादी झाले असते, गांधीवादी झाले असते, समाजवादी झाले असते पण यांपैकी काहीही झालेले दिसत नाहीत. कोणत्याही वादाने त्यांना प्रेरित केलेले दिसत नाही. त्यांचे पाय नेहमीच वास्तवावर होते. वास्तव आव्हाने समोर होती. वादाच्या तात्त्विक जंजाळात त्यांचे मन रमण्याचा संभव कमीच होता. महाराष्ट्र परिषदेच्या सर्वच कायांत ते स्वतः हिरिरीने अग्रभागी होते. सभा भरविणे तर दूरच राहिले, पण लोकांना घरी उतरू देण्यास व जेवू घालण्यासही भीती वाटावी अशा टांगत्या तलवारीच्या काळात ही तरुण मंडळी जातीय राजसत्ता व धर्मवेडया सशस्त्र जातीय वातावरणात निःशस्त्र व निर्भयपणे हिंडत होती. त्यांच्याजवळ स्वतःच्या शरीररक्षणाचे बचावाचे साधन तरी कोणते होते ? आपल्याच मनातील ध्येयवाद व आपल्याच मनातील बेडरपणा यापलीकडे बाहेर कुठे आश्रय सापडणेच शक्य