पान:वाटचाल (Vatchal).pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांजवे मास्तर : ९७

(आजच्या काळी त्याची किंमत किती ?) मिळवतो हे कर्तृत्व थोडे नव्हते.
 राजकारणाकडे गांजवे का खेचले जावेत हे कळत नाही. शामरावजी बोधनकर राजकारणाकडे का वळले हे कळू शकते. कारण रस्त्याने ते जात असले तरी अन्याय व संकटाचा शोध घेत जातात. अन्याय कुठेही, कुणावरही घडो, त्याचा प्रतिकार करण्याची आपली जबाबदारी आहे असे समजण्याचा उत्साह शामरावजींजवळ आहे. तसे गांजवे मास्तरांचे नाही. ते नेहमी शांत व विचारीच होते. त्यांच्या तरुणपणाच्या आठवणीही तशाच आहेत. सगळी चर्चा चालू असताना गांजवे स्तब्ध बसायचे. चर्चेनंतर एखादा निर्णय घेतला जाई व मग तो अमलात कोणी आणावयाचा ह्यावर चर्चा सुरू होई. मांजराच्या गळ्यात घंटा बांधली पाहिजे हा निर्णय उत्साहपूर्वक घेणाऱ्यांत गांजवे नसत. शेवटी प्रश्न येई की हे काम प्रत्यक्षपणे करणारे कोण ? गांजवे मास्तर शांतपणे उभे राहून हे आपण करू असे आत्मविश्वासपूर्वक सांगत. भाषा नेहमीच संथ व निश्चयी, पण तिला कधी खळखळाट नव्हता. मुद्दाम संकटे हुडकीत फिरावयाचे हा त्यांचा स्वभाव नाही. पण एकदा का विचारपूर्वक हे आव्हान स्वीकारावयाचे ठरले म्हणजे मग जर, तर, पण, परंतु ही भानगड नाही. हुतात्मेपणाचा आवेशही नाही. पूज्य स्वामीजींनी अशी एक आठवण नोंदविली आहे की लातूर अधिवेशनाच्या वेळी राष्ट्रध्वज उभारण्यावर बंदी घालण्यात आली. तो उभारला पाहिजे यावर सर्वांचे एकमत होते. सगळेच मनातून चिडलेले होते. अन्यायाचा प्रतिकार झालाच पाहिजे असे सर्वांचे म्हणणे होते. येथपर्यन्त गांजवे गप्प होते. शेवटी उद्या राष्ट्रध्वज उभारावयाचा व त्याचे परिणाम भोगावयाचे हा निर्णय ठरला. मग उद्या हे दिव्य कोण करणार? या क्षणी सगळी सभा शांत झाली. कोपऱ्यातून एक तरुण शांतपणे उभा राहिला व धीम्या आवाजात म्हणाला, मी राष्ट्रध्वज उभारीन ते गांजवे मास्तर होते. येथे शामरावजी बोधनकर असते तर कसे वागले असते ? माझे स्वतःचे कल्पनाचित्र असे आहे : ' रागाने लाल झालेले शामरावजी हे सडकेवर भेटलेल्याला अन्याय समजावून सांगत आहेत. सभा तेच बोलावणार. प्रारंभीच 'हा अन्याय आहे, तो मी सहन करणार नाही. मी झेंडा उभारणारच' याची घोषणा करणार व मग सहकाऱ्यांना विचार करून निर्णय देण्यास सांगणार. तो सांगताना म्हणणार की, 'माझा निश्चय ठरला आहे, पण तुम्ही विचार करा. मीही विचार करण्यास तयार आहे. मात्र तुम्ही नको म्हणालात तरी मी उद्या ध्वज उभारणारच,' इत्यादी इत्यादी.' संकटांना सामोरे जाण्याचा त्यांचा उत्साह अमाप असतो. गल्लीत सर्वत्र दंगे होत आहेत अशा वेळी सवीना घरी जा म्हणून सांगणारे शामरावच व दंगा कुठे होतो आहे हे पाहण्यासाठी एकटे बाहेर पडणारे शामरावच ! शामराव सारखा अपेक्षाभंगाचा धक्का सहन करू शकत नाहीत. ते फार लवकर कडवट होतात. शामराव, देव, गांजवे तिघेही