पान:वाटचाल (Vatchal).pdf/96

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९६ : वाटचाल

नाही. कारण हा साधा पण कठोर निसर्गनियमच आहे.
 गांजवे मास्तरांचा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील कडती या गावचे. काय चमत्कार पाहा ! शेवटी याही माणसाचा जिल्हा परभणीच असावा ? तेथून अगदी लहानपणीच गांजवे मास्तर पुसदला म्हणजे वऱ्हाडात बहिणीकडे शिक्षणासाठी गेले. वयाच्या पंधराव्या वर्षापूर्वीच वडिलांचे व बहिणीचे छत्र संपले व मास्तर एकाकी झाले. कठोर प्रतिकूल परिस्थितीचा खडक फोडीतच ज्यांना वाढावे लागते- लहानाचे मोठे व्हावे लागते, त्यांना स्वप्नाळू राहणे केव्हाही परवडणारे नसते. उच्च ध्येयवादाचा जप अशा मंडळींच्या तोंडी नसतो. वास्तववाद हाच त्यांचा एकमेव साथीदार असतो. या माणसांना तसे खरोखरीचे बाल्यही नसते. त्यांना अकालीच प्रौढ व समजूतदार व्हावे लागत असते. कारण लाड करणारे मुळी कुणी नसतातच. तेथून ते अकिंचन अवस्थेतच १९२४ च्या सुमारास नांदेडला आले. गोदावरीच्या या नाभीस्थानी त्यांचे पुढचे सारे जीवन गेले. परभणीशी अगर यवतमाळशी त्यांचा पुन्हा घनिष्ठ संबंध कधीच आला नाही. त्यांच्या विद्यार्थिदशेतल्या आठवणी त्यांचे गुरू मांजरमकर यांनी दिलेल्या आहेत. त्यांतील एक छातीवर दगड फोडण्याच्या प्रसिद्ध प्रयोगाची आठवण आहे. २४० पौंड वजनाचा दगड छातीवर ठेवावयाचा व घण मारून फोडायचा असा हा प्रयोग होता. या प्रयोगामुळेच गांजवे यांच्याकडे मांजरमकराने लक्ष वेधले गेले. पुढच्या काही दिवसांत आपल्या सेवाशील व ऋजू स्वभावामुळे त्यांनी श्री. रामराव मांजरमकरांना इतके मुग्ध केले की ते त्यांच्याच घरी राहू लागले. उणीपुरी सात वर्षे ते या घरीच होते. अनिकेतला सगळीच घरे स्वतःची मानणे क्रमप्राप्तच होते.
 यानंतर कै. डॉ. कुर्तकोटी (शंकराचार्य) यांच्या शुभहस्ते एक पाठशाळा नांदेडला स्थापन झाली. या पाठशाळेचे सन १९२८ ला ते मुख्याध्यापक झाले. उर्दू या उलट्या लिपीशी तेव्हाही त्यांची सोयरीक जुळू शकली नाही. मधून मधून शिक्षणाचा निरोप घ्यावा लागला. पण शाळेबाहेर त्यांचा वाचनाचा छंद चालू राहिला. ही वाचनाची हौस अजूनही संपलेली नाही. तसे मास्तर बहुश्रुत आहेत. व्याख्याने ऐकण्याची हौस व जबरा उत्साह आहे. पण त्यांचे खरे वाचन जीवनग्रंथाचेच म्हटले पाहिजे. बुद्धिजीवित्व हा त्यांचा प्रकृतिधर्म नव्हे. युक्तिजीवित्व ही त्यांची वादपद्धती नव्हे.
 त्या काळच्या मानाने त्यांनी संसाराची मांडणी थोडी उशिराच केली म्हटली पाहिजे. पण भोवतालच्या परिस्थितीची आव्हाने त्यांना कधी घरी रमू देत नव्हती. शाळा सुटल्यापासून ते शिकवण्या करू लागले आणि ह्या शिकवण्या त्यांना भरपूर उत्पन्न देऊ लागल्या. खरे म्हणजे येथे थांबायला हरकत नव्हती. अनिकेत, छत्रहीन मुलगा नांदेडला येतो व पदवी नसताना शिकवण्या करून २०० रुपये महिना