पान:वाटचाल (Vatchal).pdf/95

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांजवे मास्तर : ९५

चेहरा त्रासिक दिसू लागतो. पण अजून त्याचा परिणाम सत्यनिष्ठेवर झालेला नाही.
 गांजवे मास्तरांचा पिंड राजकारणी नाही. मुत्सद्देगिरी, डावपेच, बोटचेपेपणा हा त्यांचा स्वभाव नाही. त्यांचे सौजन्य व मृदुता याला दुबळेपणा समजण्याची चूक अनेकांनी अनेकदा केलेली आहे. तत्त्वाचा प्रश्न आला म्हणजे गांजवे मास्तर किती कठोर होऊ शकतात याचा मला अनेकदा अनुभव आलेला आहे. किंवा आता मास्तर कोणत्या मुद्दयावर कठोर राहू शकतील याचा अंदाजही आलेला आहे, असे म्हणण्यासही हरकत नाही. स्वतःच्या वैयक्तिक जीवनातील अनेक असह्य यातना आणि सार्वजनिक जीवनातील अनेक अपेक्षाभंग त्यांनी पचविलेले आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर अनेक उगवते कार्यकर्ते अधःपतित होताना, अनेक सहकारी क्षुद्र बाबतीत गुरफटताना व अनेक श्रद्धास्थाने कोसळताना त्यांनी पाहिलेली आहेत. तरीही त्यांना अजून कडवटपणा आलेला नाही. माणसाचा मूलभूत असा जो चांगुलपणा त्यावरील त्यांची श्रद्धा ढासळलेली नाही. ही श्रद्धा कुठून आली असावी, तिचा उगम मात्र काही केल्या कळत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील कार्यकर्ते सर्वत्र कमाल व्यक्तिनिष्ठ आढळतात. त्यांचे एक हळवे श्रद्धास्थान असते. नुसती आठवण निघाली की ते गहिवरून जातात.
 गांजवे मास्तरांना कुणाच्याच आठवणींनी असं कधी अगदी गहिवरून जाताना मी पाहिलेले नाही. जणू व्यक्तींच्या उणिवा नेहमीच त्यांनी जाणलेल्या होत्या. प्रत्यक्ष महात्मा गांधींची आठवणही त्यांनी कोरडेपणानेच सांगितली. मी एकदा सहज म्हणालो, गांधीजींचे हास्य सात्त्विक व दैवी होते असे म्हणतात. त्यावर गांजवे मास्तर म्हणाले, " म्हातारा वस्ताद आणि पक्का होता. थोडा तामसी आणि चोख दिसला. भाबडेपणा आणि हळवेपणा त्यांच्या स्वभावात नाही. जसा भडक भावनाविष्कार नाही तसा कधी पश्चात्तापही नाही. जणू सगळे उघड्या डोळ्यांनी कसे तोलन मापून घेतलेले. विनयाचासुद्धा गैरवाजवी आविष्कार नाही."
 राजकारण हा ज्यांचा पिंड असतो ती माणसे ऐन क्रांतीच्या क्षणी कुठेतरी हरवून गेलेली दिसतात. कारण मुत्सद्दी मन परिस्थितीचा फायदा कसा घ्यावा याचा विचार करण्यातच गढलेले असते. निश्चयाने परिस्थिती बदलून टाकण्याची जिद्द तिथे नसते. क्रांतिपूर्वकाळात असलेल्या भ्रष्ट राजवटीशी जुळते कसे घेता येईल या विवंचनेत असणारी मंडळी क्रांतीनंतर नव्या बदलत्या परिस्थितीशी सोयीस्करपणे जुळवून घेण्याचा उद्योगच करीत असतात. जीवनातील मूलभूत श्रद्धांवर तडजोड करण्यासाठी आतुर झालेली मने नेहमीच सत्तेच्या बाजूने उभी असतात. त्यांचे फारसे नुकसान कधीच होत नसते. तडजोड न करणाऱ्यांचीच मात्र ट्रेजेडी होते. तेथे तडजोड करणाऱ्यांना व्यावहारिक यश जास्त मिळते. ते गांजवे मास्तरांसारख्यांना मिळत नाही. याविषयी खरे म्हणजे तक्रार करण्यातच अर्थ